वैजापूर तहसीलचा अजब कारभार; घरकुल लाभार्थ्यांच्या वाळू मंजुरीवरून संताप
वैजापूर (प्रतिनिधी) : शासनाच्या रमाई आवास, प्रधानमंत्री आवास व इतर घरकुल योजनांअंतर्गत मंजूर लाभार्थ्यांना मोफत पाच ब्रास वाळू उपलब्ध करून देण्याची तरतूद असतानाही वैजापूर तहसील कार्यालयातील कारभारामुळे अनेक लाभार्थी वंचित राहत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते विजय मोकळे करंजगावकर यांनी केला आहे.
घरकुल लाभार्थ्यांची यादी ग्रामसेवकांकडून तयार करून पंचायत समितीमार्फत तहसील प्रशासनाकडे मंजुरीसाठी पाठविली जाते. मात्र लासूर गटातील अनेक गावांचे प्रस्ताव तहसील कार्यालयात दाखल होणे बाकी असतानाच संबंधित वाळू डेपो संपल्याचे सांगण्यात आल्याने लाभार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
विजय मोकळे यांनी सांगितले की, करंजगाव येथील घरकुल लाभार्थ्यांचे वाळू मागणीचे प्रस्ताव ५ जून २०२६ रोजी तहसील कार्यालयात सादर करण्यासाठी नेले असता तत्कालीन नायब तहसीलदार यांनी प्रस्ताव स्वीकारण्यास टाळाटाळ केली. तसेच काही मोजक्या लाभार्थ्यांचेच प्रस्ताव आणण्याचा सल्ला देत प्रस्तावात बदल करण्यास सांगितल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
लासूर गटातील अनेक गावांचे प्रस्ताव अद्याप दाखल झालेले नसताना वाळू डेपो संपल्याचे सांगण्यात येत असल्याने उपलब्ध वाळूचा लाभ नेमका कोणाला देण्यात आला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शासनाची योजना खऱ्या अर्थाने गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत आहे का, याची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
दरम्यान, तहसील कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांना दोन ते अडीच तास प्रतीक्षा करावी लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. महसूल विभागातील कामकाजावर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याच्या टेबलाजवळ सीसीटीव्ही यंत्रणा असावी, अशी भूमिका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यापूर्वी मांडली होती. त्याची अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचेही मोकळे यांनी म्हटले आहे.
तहसीलदारांची भेट घेण्याचा प्रयत्न करूनही भेट मिळाली नाही किंवा दूरध्वनीवर संपर्क होऊ शकला नाही, असा आरोपही करण्यात आला आहे. याचवेळी काही राजकीय व्यक्तींची कामे तातडीने होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी करंजगाव येथील शेतकरी मधुकर पुंडे यांनीही आपल्या वस्तीपर्यंत मंजूर झालेल्या रस्त्याबाबत प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही समाधानकारक कार्यवाही होत नसल्याची तक्रार केली.
विजय मोकळे यांनी ५ जून रोजी तहसीलदारांकडे घरकुल लाभार्थ्यांच्या वाळू मागणी अर्ज मंजूर करण्याबाबत निवेदन सादर केले होते. त्यानंतर ८ जून रोजी काही लाभार्थ्यांच्या प्रस्तावांना मंजुरी मिळाल्याची माहिती देण्यात आली. मात्र वाळू कुठून घ्यायची, कोणाशी संपर्क साधायचा याबाबत स्पष्ट माहिती देण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
९ जून रोजी काही लाभार्थ्यांची नावे मंजूर झाल्याचे सांगण्यात आले. मात्र लाभार्थी वाळू डेपोवर पोहोचल्यानंतर संबंधित डेपोतील वाळू संपल्याचे सांगण्यात आल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत विचारणा केली असता वेगवेगळी उत्तरे देण्यात आल्याचा आरोपही मोकळे यांनी केला.
करंजगाव येथील १७ घरकुल लाभार्थ्यांच्या वाळू प्रस्तावांबाबत समाधानकारक निर्णय न झाल्यास संबंधित लाभार्थ्यांना सोबत घेऊन छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात येईल, असा इशारा विजय मोकळे यांनी दिला आहे.
या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून लासूर गटातील वाळू साठ्याचे वितरण, मंजूर व प्रलंबित प्रस्तावांची स्थिती आणि पात्र लाभार्थ्यांना मिळणाऱ्या लाभाबाबत प्रशासनाने स्पष्टता द्यावी, अशी मागणी होत आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री संजय शिरसाट तसेच जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणात लक्ष घालून पात्र लाभार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय मोकळे करंजगावकर यांनी केली आहे.
दरम्यान, करंजगाव येथील १७ घरकुल लाभार्थ्यांच्या वाळू मागणी प्रस्तावाबाबत नायब तहसीलदार यांनी सुरुवातीला टाळाटाळ केल्याचा आरोप विजय मोकळे यांनी केला आहे. प्रस्ताव स्वीकारण्यापासून ते मंजुरी प्रक्रियेपर्यंत वेळोवेळी वेगवेगळी माहिती देण्यात आली. जाब विचारल्यानंतर संबंधित लाभार्थ्यांना स्टॉकमधून वाळू उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, लासूर येथील डेपोतून वाळू उपलब्ध झाली नाही तर ती लाभार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारी ठरणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
शासन गोरगरीब घरकुल लाभार्थ्यांसाठी मोफत पाच ब्रास वाळूची योजना राबवत असताना अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे अथवा मनमानी कारभारामुळे लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळत नसेल तर ही योजना केवळ कागदोपत्रीच राहील, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
करंजगाव येथील १७ घरकुल लाभार्थ्यांच्या वाळू मागणी अर्जांना अंतिम मंजुरी मिळाली नाही किंवा संबंधित लाभार्थ्यांना वाळूचा लाभ मिळाला नाही, तर सर्व लाभार्थ्यांना सोबत घेऊन छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी तसेच राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते विजय मोकळे करंजगावकर यांनी दिला आहे.
