पिंपरी-चिंचवड, दि. ९ जून – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने मंगळवारी पहाटे चिखली-कुदळवाडी परिसरात अतिक्रमण हटविण्याची विशेष मोहीम राबवत ११ अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली. या कारवाईत काही धार्मिक स्थळांचाही समावेश असल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
महापालिकेच्या पथकाने मोठ्या पोलीस बंदोबस्तात पहाटे अडीच वाजेच्या सुमारास ही कारवाई केली. स्थानिकांच्या मते, कारवाईदरम्यान एका विशिष्ट समुदायाच्या धार्मिक स्थळांना लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर काही ठिकाणी मंदिरे आणि मशिदींवरही कारवाई झाल्याची माहिती समोर आली आहे.
कारवाईदरम्यान नागरिक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की तसेच दगडफेकीच्या घटना घडल्याचा दावा काही स्थानिकांनी केला आहे. काही पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचेही वृत्त आहे. मात्र, महापालिकेकडून किंवा स्थानिक प्रशासनाकडून याबाबत अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. शहरातील पदाधिकाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले असून कारवाई नियमानुसार झाल्याचा दावा केला आहे.
दरम्यान, कारवाईपूर्वी स्थानिक नागरिकांनी महापालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांना निवेदन देऊन अतिक्रमण हटविताना पारदर्शकता राखण्याची आणि कोणत्याही एका समुदायाला लक्ष्य करू नये, अशी मागणी केली होती. मात्र त्यानंतर काही तासांतच कारवाई झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
कुदळवाडी परिसरातील लघुउद्योजकांनीही प्रशासनाच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. गेल्या काही वर्षांत अतिक्रमण, प्रदूषण आणि विविध कारणांमुळे अनेक उद्योग व व्यावसायिक आस्थापनांवर कारवाई करण्यात आली असून हजारो कुटुंबांच्या रोजगारावर परिणाम झाल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. परिसरातील जमिनींचे भवितव्य, झोनिंग धोरण आणि पुनर्वसनाबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
नागरिकांनी सर्व प्रकारच्या अतिक्रमणांवर समान निकषांनुसार कारवाई व्हावी, अशी मागणी केली असून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याचीही मागणी पुढे आली आहे. आवश्यक असल्यास न्यायालयीन मार्ग अवलंबण्याचा इशाराही स्थानिकांनी दिला आहे.दरम्यान, विशिष्ट समुदायाला लक्ष्य केल्याच्या आरोपांबाबत महानगरपालिकेची अधिकृत आणि सविस्तर भूमिका अद्याप समोर आलेली नसून प्रशासनाच्या स्पष्टीकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
