उत्तर म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांची जलद कारवाई
पिंपरी, दि. ७ जून : उत्तर म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या अपघातातील जखमी व्यक्तीला उपचारासाठी न नेता त्याचा मृतदेह शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत टाकून फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत अटक केली आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
दि. ४ जून २०२६ रोजी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास चाकण-तळेगाव रोडवरील खालुंब्रे येथे एचपी पेट्रोल पंपासमोर मनोजकुमार रामजी विश्वकर्मा (वय ३५, रा. खालुंब्रे, ता. खेड, जि. पुणे) हे पायी रस्ता ओलांडत असताना एका अज्ञात पिकअप वाहनाने त्यांना धडक दिली. धडकेनंतर वाहनचालक खाली उतरून जखमी मनोजकुमार यांना स्वतःच्या वाहनात घेऊन गेला; मात्र त्यांना वैद्यकीय उपचारासाठी दाखल केले नाही.
या घटनेप्रकरणी उत्तर म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४९७/२०२६ अन्वये बीएनएस कलम २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १८४, १९९ आणि १७७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान पोलीस नाईक काळे यांनी घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. त्यामध्ये अपघात करणारे वाहन महिंद्रा बोलेरो पिकअप (एमएच-१२ झेडई-०७७९) असल्याचे निष्पन्न झाले. पुढील चौकशीत चालकाने गंभीर जखमी अवस्थेतील मनोजकुमार यांना उपचारासाठी न नेता वाहनातून घेऊन गेल्याने वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले.
त्यानंतर आरोपीने मृत मनोजकुमार यांचा मृतदेह शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रस्त्यावर टाकून घटनास्थळावरून पलायन केल्याचे तपासात उघड झाले. या गंभीर प्रकाराची दखल घेत पोलिसांनी गुन्ह्यात बीएनएस २०२३ मधील कलम १०५ ची वाढ केली.
या प्रकरणी आरोपी मेहबूब लकीब मोहम्मद शेख (वय ४०, रा. जवळा, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला ९ जून २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिस मुल्ला करीत आहेत.ही कारवाई पोलीस उप आयुक्त श्रीमती श्वेता खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.