“स्वच्छ शहरासाठी कचऱ्याचे स्रोतस्तरावर वर्गीकरण आणि लोकसहभाग हाच यशाचा मंत्र” – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी
पिंपरी, दि. ६ जून २०२६ : केंद्र शासनाने अधिसूचित केलेल्या घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शुक्रवारी ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यशाळेस अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने अधिसूचना क्र. एस.ओ. ३८८ (अ) द्वारे घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ जाहीर केले असून १ एप्रिल २०२६ पासून त्यांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयानेही या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नव्या नियमांची सविस्तर माहिती देण्यासाठी तसेच त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
यावेळी मार्गदर्शन करताना आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घनकचऱ्याचे स्रोतस्तरावर वर्गीकरण, शास्त्रोक्त प्रक्रिया आणि वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे महत्त्व अधोरेखित केले. स्वच्छ, हरित आणि शाश्वत शहर घडविण्यासाठी प्लास्टिकचा वापर कमी करणे, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार मोठ्या आस्थापनांना नियमांच्या पालनासाठी मार्गदर्शन केले जाणार असून शहर विद्रूप करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
नागरिकांनी शहराला स्वतःचे घर समजून स्वच्छतेसाठी महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन करत त्यांनी गृहनिर्माण संस्थांमध्ये कचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृतीसाठी विशेष कार्यशाळा घेण्यात येणार असल्याची माहिती दिली. लोकसहभागातूनच स्वच्छ आणि सुंदर शहर उभे राहू शकते, असा विश्वास व्यक्त करत फूटपाथ, रस्ते आणि अतिक्रमणांवरील कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले. भविष्यात पिंपरी-चिंचवड हे देशातील स्वच्छ आणि आदर्श शहरांपैकी एक म्हणून ओळखले जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमात ‘माझी वसुंधरा ५.०’ अभियानात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उद्यान, पर्यावरण आणि आरोग्य विभागातील गुणवंत कर्मचाऱ्यांचा आयुक्तांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनी नवीन नियमांमुळे घनकचरा व्यवस्थापन अधिक शिस्तबद्ध, परिणामकारक आणि उत्तरदायी होणार असल्याचे सांगितले. नियमांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी विभागीय समन्वय, नियमित निरीक्षण आणि नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी केले. त्यांनी घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ मधील विविध तरतुदींची माहिती देत कचऱ्याचे वर्गीकरण, संकलन, वाहतूक, प्रक्रिया आणि विल्हेवाट यासंदर्भातील जबाबदाऱ्या स्पष्ट केल्या. तसेच नियमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व्यापक जनजागृतीला प्राधान्य दिले जाणार असल्याचे सांगितले.
या कार्यशाळेस मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, सह शहर अभियंता मनोज सेठिया, मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे, उप आयुक्त अण्णा बोदडे, क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील, कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट, सोहम निकम, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सहाय्यक आरोग्य अधिकारी श्रीराम गायकवाड यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.
