सोन्या-चांदीचे सर्व दागिने जप्त; १०० टक्के मुद्देमाल हस्तगत;सीसीटीव्ही आणि खबऱ्यांच्या माहितीच्या आधारे आरोपी जेरबंद
पिंपरी-चिंचवड : देहूरोड पोलिसांनी घरफोडीच्या गंभीर गुन्ह्याचा अवघ्या २४ तासांत छडा लावत अट्टल घरफोड्या करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून चोरीस गेलेले सोन्या-चांदीचे सर्व दागिने जप्त करण्यात आले असून गुन्ह्यातील १०० टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
देहूरोड येथील गोयल निवास, फ्लॅट क्रमांक २, मुंबई-पुणे रोड, मेन बाजार परिसरातील घराला कुलूप लावून रहिवासी बाहेर गेले असताना २ जून रोजी सायंकाळी ४.३० ते ३ जून रोजी सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने घराचा कडी-कोयंडा व कुलूप तोडून प्रवेश केला. घरातील सुमारे ५२ ग्रॅम सोन्याचे आणि २२५० ग्रॅम चांदीचे दागिने चोरी करून नेल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १६८/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३३१ (४) व ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल कुबडे यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपीचा तातडीने शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार देहूरोड पोलीस ठाण्याच्या तपास पथकाची दोन विशेष पथके तयार करण्यात आली.
तपासादरम्यान घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली. त्यामध्ये भगव्या रंगाची ऑटो रिक्षा संशयास्पदरीत्या आढळून आली. सीसीटीव्ही व गुप्त बातमीदारांच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या रिक्षेचा माग काढत देहूगाव परिसरात शोधमोहीम राबविली. वैकुंठ मंदिराजवळ उभी असलेली एमएच-१४ जेपी-०२९५ क्रमांकाची रिक्षा आढळल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून एका संशयिताला ताब्यात घेतले.
चौकशीत त्याने आपले नाव विक्रमसिंग विठ्ठलसिंग ठाकुर (वय ३७, रा. देहूगाव) असे सांगितले. त्याच्या रिक्षेत लोखंडी कटावणी आढळून आली. अधिक चौकशीत त्याने सदर घरफोडीची कबुली दिली. आरोपीच्या घराची झडती घेतली असता चोरीतील सर्व सोने-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले.
तपासात आरोपी हा अट्टल घरफोड्या करणारा असून त्याच्याविरोधात निगडी, भोसरी, चिखली, वाकडसह विविध पोलीस ठाण्यांमध्ये घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याने आणखी कोणत्या घरफोड्या केल्या आहेत, याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर व सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल कुबडे यांच्या अधिपत्याखाली करण्यात आली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक अक्षय जाधव, पो.उप.नि लखनकुमार वाव्हळे,पोलीस हवालदार किरण खेडकर, बाळासाहेब विधाते तसेच प्रशांत माळी, केतन कानगुडे, पंकज भदाणे, अमोल माने, शुभम बावणकर आणि मोमीन शेख यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.
