पिंपरी-चिंचवड : हिंजवडी पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधातील कारवाईत १ लाख ६० हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून राजस्थान येथील एका आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणी एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २ जून २०२६ रोजी सायंकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास चांदेफाटा जवळ, महात्मा फुले अपंग प्रशिक्षण केंद्रासमोर, भोईरवाडी-माणकडे रोडच्या कडेला, ता. मुळशी, जि. पुणे येथे ही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी पोलीस हवालदार मधुकर मल्लिकार्जुन कोळी (हिंजवडी पोलीस स्टेशन) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी पुष्पेंद्रसिंग किरपाराम (वय ३९, रा. कोठो की ढाणी, पो. हिरा की ढाणी, जि. बाडमेर, राजस्थान) यास अटक करण्यात आली आहे.
तपासादरम्यान आरोपीच्या ताब्यातून १० किलो ३०० ग्रॅम डोडा चुरा (अफूच्या बोंडांचा सुकलेला चुरा), एक मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकूण १ लाख ६० हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी हा सदर अंमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या बाळगत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्याविरुद्ध हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३७७/२०२६ नोंद करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.