मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाची धडक कारवाई; दोघांना अटक, एजन्सी मालक फरार
चाकण, पुणे | प्रतिनिधी…..पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने चाकण परिसरात सुरू असलेल्या अवैध गॅस रिफिलिंग व्यवसायावर धडक कारवाई करत २५१ गॅस सिलेंडर, रिफिलिंग साहित्य आणि एक बोलेरो टेम्पोसह एकूण ९ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून एजन्सी मालकाविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी आयुक्तालय हद्दीतील अवैध व्यवसायांवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केली.
पोलीस अंमलदार समीर रासकर, गणेश कोकणे आणि अमर कदम यांना चाकण उत्तर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बालाजी गॅस एजन्सी, मार्केट यार्ड परिसरात भरलेल्या गॅस सिलेंडरमधून छोट्या सिलेंडरमध्ये अवैधरित्या गॅस भरला जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला.
छाप्यात एजन्सी मालक शुभम प्रवीण परदेशी (रा. चाकण) याच्या सांगण्यावरून काम करणारे प्रकाश सिद्धांना जवळागी (वय ३२) आणि तुषार प्रफुल्ल वारुळे (वय ३६) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून २५१ गॅस सिलेंडर, वजनकाटा, रिफिलिंग नॉझल व इतर साहित्य तसेच महिंद्रा बोलेरो टेम्पो असा एकूण ९.७१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
प्राथमिक तपासात आरोपी कोणतीही सुरक्षितता न बाळगता भरलेल्या सिलेंडरमधून इतर सिलेंडरमध्ये गॅस भरत असल्याचे निष्पन्न झाले आहे. हा व्यवसाय करताना मानवी जीवितास गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता असूनही आवश्यक खबरदारी घेण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४८७/२०२६ नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता कलम २८७, २८८, जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३ व ७ तसेच स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ चे कलम ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाकडून सुरू आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर,अप्पर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
