पिंपरी-चिंचवड, दि. ४ जून : किवळे येथील एका बांधकाम प्रकल्पावर सुरक्षा साधनांची व्यवस्था न केल्याने तिसऱ्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे.
देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १६९/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम १०५, ४९ व ३(५) अन्वये नोंद करण्यात आला आहे. हा प्रकार ३ जून २०२६ रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास किवळे येथील सीएमएस स्कूलजवळील बांधकाम साईटवर घडला.
फिर्यादी अजमत नजरुल खान (वय २२, रा. पुनावळे, मूळ रा. मालदा, पश्चिम बंगाल) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, बांधकाम साईटवर काम करणाऱ्या कामगारांना सुरक्षा दृष्टीने आवश्यक असलेले सेफ्टी शूज, सेफ्टी बेल्ट, हेल्मेट, जॅकेट, दोरखंड अथवा शिडी उपलब्ध करून देण्यात आली नव्हती. जीवितास धोका असल्याची जाणीव असूनही कामगारांना तिसऱ्या मजल्यावर सेफ्टी नेटचे काम करण्यास सांगण्यात आले.
दरम्यान, फिर्यादी आणि सनी शेख हे दोघे सेफ्टी नेटचे काम करत असताना सनी शेख याचा तोल गेला. त्यामुळे तो तिसऱ्या मजल्यावरून खाली पडला. डोके व मानेस गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी राहुल दुधनाथ महतो (वय २१), सय्यद रफिकुल हुसेन अली (वय ३२) आणि सागर विनोद सावंत (वय ५०) यांच्यासह संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी क्रमांक १ ते ३ यांना पोलिसांनी अटक केली आहे.या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दुगावकर करीत आहेत.