पुणे : चऱ्होली परिसरात एका व्यक्तीवर कोयत्याने व लाथा-बुक्क्यांनी जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जखमी व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याचा समज करून आरोपींनी त्याला गाडीतून निर्जन ठिकाणी फेकून पळ काढल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आळंदी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ जून २०२६ रोजी रात्री ११.३० ते १.३० वाजण्याच्या दरम्यान राहुल गार्डनसमोर, काटे वस्ती, चऱ्होली तसेच आळंदी-वडगाव रोडलगतच्या परिसरात ही घटना घडली. फिर्यादी वसिम हुसेन शेख (वय ३३, रा. दत्तनगर, आळंदी) यांच्यावर आरोपींनी जिवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला.
या प्रकरणात प्रेग जाधव, करण सोळंके, माऊली निरस, सोन्या जाधव, बंडू लोणकर तसेच चार ते पाच अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी करण सोळंके आणि माऊली निरस यांना पोलिसांनी अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
तक्रारीनुसार, आरोपींनी फिर्यादीवर कोयत्याने वार करत लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात फिर्यादीच्या हात, गुडघा, डोके आणि हनुवटीवर गंभीर दुखापती झाल्या. दरम्यान, बंडू लोणकर याने व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलद्वारे फिर्यादीला ठार मारण्याचे निर्देश दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
मारहाणीनंतर फिर्यादीचा मृत्यू झाला असल्याचे समजून आरोपींनी त्याला पुन्हा वाहनात टाकले आणि विश्रांतवाडी-वडगाव रोड परिसरातील एका मोकळ्या जागेत फेकून देत तेथून पसार झाले, असे फिर्यादीने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १४०(३), १०९, ३५२, ३५१(३), १८९, १९०, १९१(२), १९१(३), आर्म्स ॲक्ट तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रहाणे करीत आहेत.