पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला;१ लाखांहून अधिक किमतीच्या ८१ गॅस टाक्या जप्त
मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाची धडक कारवाई!
चाकण प्रतिनिधी….पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने अवैध गॅस रिफिलिंग व्यवसायावर मोठी कारवाई करत १ लाख ३०० रुपयांच्या ८१ गॅस टाक्या जप्त केल्या आहेत. चाकण-महालुंगे रोडवरील खराबवाडी येथे सुरू असलेला हा धोकादायक व्यवसाय पोलिसांनी छापा टाकून उघडकीस आणला.
पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे यांच्या आदेशानुसार आयुक्तालय हद्दीतील अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने गुप्त माहितीच्या आधारे २ जून २०२६ रोजी छापा टाकला.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हनुमान मंदिरासमोरील ‘जय गणेश भारत गॅस’ या दुकानात घरगुती गॅस सिलेंडरमधून अवैधरित्या गॅस काढून इतर सिलेंडरमध्ये भरला जात होता. कोणतीही सुरक्षा व्यवस्था किंवा खबरदारी न बाळगता सुरू असलेल्या या व्यवसायामुळे परिसरातील नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला होता.
छाप्यामध्ये सचिन प्रकाश म्हस्करे (वय ३१, रा. खराबवाडी, खेड, पुणे) याला एका विधी संघर्षग्रस्त बालकासह हा व्यवसाय चालविताना रंगेहात पकडण्यात आले. घटनास्थळावरून गॅस रिफिलिंगसाठी वापरले जाणारे साहित्य आणि ८१ गॅस टाक्या जप्त करण्यात आल्या.
या प्रकरणी उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४७९/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम २८७, २८८, जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३ व ७ तसेच स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ चे कलम ५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त श्री. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त श्री. सारंग आवाड, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्यासह स.पो.नि. पांडुरंग देवकाते, गोरक्षनाथ बालवडकर, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक महेश खांडे आणि पथकातील अंमलदारांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
