कंपनीच्या सीईओसह तिघांविरुद्ध गुन्हा
हिंजवडी, दि. २ जून २०२६ : हिंजवडी परिसरातील एका आयटी कंपनीत प्रशिक्षण व नोकरीचे आमिष दाखवून उमेदवारांकडून पैसे घेऊन त्यांच्याकडून काम करून घेतल्यानंतर पगार न देता फसवणूक केल्याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंजवडी पोलिस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक ३७१/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२), ३१८(४) व ३(५) अंतर्गत हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याप्रकरणी सौरव राजन नावर (वय २५, रा. देहूरोड, ता. हवेली, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षल भानुदास ठाकरे (सीईओ), ध्रुविल पारेख (ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट विभाग) आणि सौम्या सिंग (एचआर) तसेच कंपनीतील इतर संबंधित व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, सप्टेंबर २०२५ पासून ते आजपर्यंत मेरा इम्पेरिअम राईज, १० वा मजला, १०४१, विप्रो सर्कल, हिंजवडी फेज-२, पुणे येथे आरोपींनी संगनमत करून प्रशिक्षण व नोकरीच्या नावाखाली उमेदवारांकडून प्रत्येकी १५ हजार रुपये घेतले. त्यानंतर संबंधितांना प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून प्रत्यक्ष काम करून घेण्यात आले. मात्र विविध कारणे सांगून त्यांना नोकरी व पगारापासून वंचित ठेवण्यात आले.
तसेच फिर्यादी व साक्षीदारांनी दोन महिने केलेल्या कामाचा मोबदला न देता आरोपींनी एकूण ११ लाख २५ हजार रुपयांची रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरून फसवणूक केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.