पिंपरी, दि. २ जून २०२६: भरधाव वेगाने आणि बेदरकारपणे दुचाकी चालविल्याने झालेल्या अपघातात एका २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना नवी सांगवी येथील मनोहर पर्रीकर अंडरपास परिसरात घडली. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सांगवी पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक २३३/२०२६ नुसार, ही घटना ३१ मे २०२६ रोजी पहाटे सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास नवी सांगवी येथील सुदर्शन चौकाजवळील मनोहर पर्रीकर अंडरपास येथे घडली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रज्वल प्रशांत शिंदे (वय २२, रा. गोकुळनगर, धानोरी) याने त्याच्या ताब्यातील एमएच १४ जे-क्यू ४१०८ क्रमांकाची दुचाकी भरधाव वेगाने, अविचाराने व हयगयीने चालविली. वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने वाहन डिव्हायडरवर जाऊन आदळले.
या अपघातात दुचाकीच्या मागील सीटवर बसलेला अमन आबाज शेख (वय २२, रा. वल्लभनगर, पिंपरी) याला गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अपघातात चालक प्रज्वल शिंदे हाही गंभीर जखमी झाला आहे.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ व ११९/१७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नसून पुढील तपास सांगवी पोलीस करत आहेत.या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक आकमवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.