पाच दिवसांत १७० आरोपी जाळ्यात; ५२ हजार लिटरहून अधिक गावठी दारू जप्त व नष्ट
पिंपरी, दि. २ जून : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने अवैध दारू व्यवसायाविरोधात सुरू केलेल्या विशेष मोहिमेत मोठी यशस्वी कारवाई केली आहे. अवघ्या पाच दिवसांत १७० आरोपींविरुद्ध १६१ गुन्हे दाखल करत ५२ हजार २०९ लिटर गावठी व हातभट्टी दारू जप्त अथवा नष्ट करण्यात आली असून सुमारे ४० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या आदेशानुसार २८ मे २०२६ पासून आयुक्तालय हद्दीत गावठी हातभट्टी व इतर अवैध दारू धंद्यांविरोधात व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे. अवैध दारू व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत.
दारूबंदी कायद्यांतर्गत मोठ्या प्रमाणावर गुन्हे दाखल
या मोहिमेदरम्यान भा.न्या.सं. कलम १२३ तसेच दारुबंदी कायद्यांतर्गत १० गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत १० आरोपींना अटक करून १,१४० लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. या मुद्देमालाची किंमत सुमारे ११.२१ लाख रुपये आहे.
हातभट्टी अड्ड्यांवर धाड; २२ हजार लिटर दारू नष्ट
हातभट्टी दारू उत्पादन करणाऱ्यांविरोधात ६ गुन्हे दाखल करण्यात आले असून ६ आरोपींवर कारवाई करण्यात आली. यावेळी २२ हजार ८० लिटर गावठी दारू नष्ट करण्यात आली. निष्कासित करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत ९.२९ लाख रुपये आहे.
दारू विक्रेत्यांविरोधात सर्वाधिक कारवाई
गावठी व हातभट्टी दारू विक्री करणाऱ्यांविरोधात सर्वाधिक १४५ गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणांमध्ये १५४ आरोपींवर कारवाई करण्यात आली असून २८ हजार ९८९ लिटर दारू जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत १९.५५ लाख रुपये आहे.
एकूण कारवाईचा आढावा
*दाखल गुन्हे : १६१
*आरोपी : १७०
*जप्त/नष्ट दारू : ५२,२०९ लिटर
*एकूण मुद्देमाल : ₹४०,०५,५३६
नागरिकांना पोलिसांचे आवाहन
गावठी हातभट्टी दारू, अवैध दारू निर्मिती, साठवणूक, वाहतूक किंवा विक्रीबाबत माहिती असल्यास नागरिकांनी तात्काळ ११२ या हेल्पलाईनवर किंवा पिंपरी-चिंचवड पोलीस नियंत्रण कक्षाच्या ९५२९६९१९६६ व ०२०-२६२०९१२२या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, “अवैध दारू धंद्यांविरोधातील ही विशेष मोहीम पुढील काळात अधिक तीव्र करण्यात येणार असून कायदा मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार आहे.”
