चाकण : स्वतःच्या कंपनीत झालेल्या चोरीची माहिती तब्बल ४० दिवसांनंतर मिळाल्यानंतरही उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी तांत्रिक तपास आणि अथक मेहनतीच्या जोरावर ३६ लाख रुपये किमतीच्या बीअर स्टोरेज टाक्यांच्या चोरीचा यशस्वी उलगडा केला आहे. या प्रकरणात कंपनीतील माजी विश्वासू कर्मचाऱ्यासह सहा जणांना अटक करण्यात आली असून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
मौजे सावरदरी (ता. खेड, जि. पुणे) येथील “टाईने रिबेल” या उभारणी सुरू असलेल्या बीअर उत्पादन कंपनीतील १० लहान-मोठ्या बीअर स्टोरेज टाक्या २० फेब्रुवारी ते ३० मार्च २०२६ या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्या होत्या. या टाक्यांची किंमत सुमारे ३६ लाख रुपये इतकी आहे. याबाबत कंपनीचे प्रतिनिधी विवेक मारुती खैरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात बीएनएस कलम ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
विशेष म्हणजे, चोरी झाल्याचे फिर्यादीच्या लक्षातच सुमारे ४० दिवसांनंतर आले होते. त्यामुळे पोलिसांकडे कोणतेही तात्काळ पुरावे किंवा ठोस धागेदोरे उपलब्ध नव्हते. अशा कठीण परिस्थितीत पोलीस उपआयुक्त श्वेता खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची सूत्रे वेगाने हलविण्यात आली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी आणि सहायक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने परिसरातील ३० ते ३५ कंपन्यांचे तब्बल ६०० जीबीपेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. दीड महिन्यांच्या फुटेजची बारकाईने छाननी करताना संशयित क्रेन आणि ट्रकची ओळख पटविण्यात आली.
तांत्रिक विश्लेषण, कामगारांची चौकशी आणि आर्थिक व्यवहारांची पडताळणी यामधून कंपनीतील पूर्वीचा कर्मचारी प्रसाद राजळे याच्यावर संशय बळावला. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली. त्यानंतर चोरीत सहभागी असलेले आणि चोरीचा माल खरेदी करणारे इतर आरोपीही पोलिसांच्या जाळ्यात अडकले.
पोलिसांनी कुदळवाडी (चिखली) आणि मुंब्रा (ठाणे) परिसरातून चोरीस गेलेल्या सर्व १० बीअर स्टोरेज टाक्या जप्त केल्या. त्यामुळे ३६ लाख रुपयांचा संपूर्ण मुद्देमाल परत मिळविण्यात यश आले.
प्रसाद विनोद राजळे (रा. पिरंगुट, ता. मुळशी),चंदन अर्जुन सिंग (रा. कुदळवाडी, चिखली),अली अहमद चौधरी (रा. कुदळवाडी, चिखली),फिरोज असगर अली खान (रा. मोशी),किसनकुमार सुभाषचंद्र गुप्ता (रा. कुदळवाडी, चिखली),नियाज मोहम्मद इसराईल (रा. मुंब्रा, ठाणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत
या उल्लेखनीय कारवाईसाठी उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, अत्यल्प धागेदोरे असतानाही तांत्रिक तपासाच्या आधारे गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांनी मोठे यश मिळविले आहे.