उद्योजक अनिल गायकवाड यांनी पीडित मातंग विद्यार्थिनीच्या शिक्षणाची घेतली जबाबदारी
पिंपरी चिंचवड, दि. १ जून : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती शिवशाही शासन व शिवशाही व्यापारी संघाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने इंदापूर तालुक्यातील भाटनिमगाव येथील एका पीडित मातंग विद्यार्थिनीचे शिक्षण दत्तक घेण्याचा स्तुत्य उपक्रम उद्योजक अनिल गायकवाड यांनी हाती घेतला. या निर्णयाचे शिवशाही शासनाचे संस्थापक प्रमुख लोकसेवक युवराज दाखले यांनी विशेष कौतुक केले असून बहुजन समाजातून या उपक्रमाचे स्वागत करण्यात येत आहे.
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमात “शिक्षण हेच खरे दान” हा संदेश देण्यात आला. तसेच रक्तदान शिबिराचे आयोजनही करण्यात आले.
यावेळी बोलताना लोकसेवक युवराज दाखले म्हणाले, “राजमाता अहिल्यादेवी होळकर या न्याय, कर्तव्य आणि मातृत्वाचे प्रतीक होत्या. त्यांच्या जयंतीनिमित्त केवळ औपचारिक कार्यक्रम न करता एखाद्या गरजू लेकीला शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हीच त्यांना खरी आदरांजली आहे. उद्योजक अनिल गायकवाड यांनी भाटनिमगाव येथील पीडित मातंग विद्यार्थिनीचे शिक्षण दत्तक घेऊन समाजापुढे प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.”
दाखले यांनी पुढे सांगितले की, अनिल गायकवाड यांनी भविष्यात मातंग व बहुजन समाजातील इतर मुलींनाही शिक्षणासाठी दत्तक घेण्याचा संकल्प केला असून हा उपक्रम समाजपरिवर्तनासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
कार्यक्रमास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रबोधन पर्वचे अध्यक्ष अशोक भाऊ खरात, शिवशाही व्यापारी संघाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णा साबळे, उपाध्यक्ष मंगेश डाखोरे, शिवशाही महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा उषामाई कांबळे, शहराध्यक्ष शिवाजीराव खडसे, तृतीयपंथी भगिनी आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा अर्चना शिंदे, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा अनिता वैरागळ, कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गणेश कलवले, माथाडी कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सचिन दोनगहू, शिव वाहतूक सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश खरात यांच्यासह विविध पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते.
यावेळी युवराज दाखले यांनी राज्यातील उद्योजक, व्यापारी व समाजबांधवांना आवाहन करताना सांगितले की, “प्रत्येकाने एका गरजू मुलीचे शिक्षण दत्तक घेतले तर बहुजन समाजातील अनेक लेकी उच्च शिक्षण घेऊन डॉक्टर, अभियंता, प्रशासकीय अधिकारी बनू शकतील. हीच राजमाता अहिल्यादेवींना खरी श्रद्धांजली ठरेल.”
