थेरगाव....पिंपरी-चिंचवड शहरातील थेरगाव परिसरात दारूचे बिल भरण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीवर बाटलीने हल्ला करून गंभीर मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २२६/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१), ११५ (२), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि.२७ मे २०२६ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास सचिन वाईन्स, थेरगाव, पुणे येथे घडली. याबाबतचा गुन्हा दि.२८ मे २०२६ रोजी पहाटे ४.२९ वाजता नोंदविण्यात आला.
या प्रकरणी मारुती रामधन रुडे (वय ५१, व्यवसाय – बिगारी कामगार, रा. पवारनगर लेन नं.१, थेरगाव, पुणे, मूळगाव – हारु, ता. दारव्हा, जि. यवतमाळ) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींमध्ये १) बंदु (पूर्ण नाव माहित नाही, वय अंदाजे २५ वर्षे), २) दत्ता पाटेकर (वय अंदाजे २५ वर्षे) तसेच त्यांचे अन्य साथीदार यांचा समावेश आहे. यातील आरोपी क्रमांक २ दत्ता पाटेकर याला पोलिसांनी अटक केली आहे.
फिर्यादी यांनी आरोपी क्रमांक १ याचे दारूचे बिल भरण्यास नकार दिल्याने आरोपी संतप्त झाले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. तसेच आरोपी दत्ता पाटेकर याने रिकामी बाटली फोडून फिर्यादीच्या पाठीवर व डाव्या हातावर वार करून जखमी केले असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.या घटनेचा पुढील तपास स.पो.नि नलावडे करीत आहेत.