पिंपरी-चिंचवड : दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी हातभट्टीची दारू पिऊन १० जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, या घटनेप्रकरणी आम आदमी पार्टीने पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.
आपचे पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्ष श्री. यशवंत श्रीमंत कांबळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आम आदमी पार्टीने ०५ मे रोजी पोलीस आयुक्तालयाकडे लेखी निवेदन देऊन हातभट्टी दारूचे अड्डे बंद करण्याची मागणी केली होती. मात्र, प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने आज १० निष्पाप नागरिकांचा जीव गेला आहे.
“वेळेत कारवाई झाली असती, तर ही दुर्घटना टळू शकली असती. त्यामुळे या घटनेस पोलीस प्रशासन जबाबदार आहे,” असा आरोपही त्यांनी केला.या प्रकरणाची चौकशी करून संबंधित निष्काळजी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी व त्यांना बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणीही आपने केली आहे.
राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर टीका करताना कांबळे म्हणाले की, “महाराष्ट्राची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली असून, याला सत्ताधारी पक्ष जबाबदार आहे.”दरम्यान, मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी तसेच पिंपरी-चिंचवडमधील सर्व अवैध धंदे तात्काळ बंद करावेत, अशी मागणी आम आदमी पार्टीने केली आहे.