अहिल्यानगर शिर्डी: श्री साईबाबांच्या नगरीत ३ जून २०२६ रोजी लोककलावंतांचा भव्य राष्ट्रीय महामेळावा आयोजित करण्यात आला असून या सोहळ्यात ग्रामीण आणि पारंपरिक कला सादर करणाऱ्या अनेक दिग्गज कलावंतांचा “राष्ट्रीय साई जीवन गौरव पुरस्कार” देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
श्री साईबाबा संस्थान शिर्डी यांच्या सहकार्याने तसेच लोककलावंत सांस्कृतिक विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि अन्याय अत्याचार विरोधी युवा व महिला संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
ही माहिती लोककलावंत सांस्कृतिक विचार मंच महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष गवनेरजी सरोदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
गवनेरजी सरोदे यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील अनेक उत्कृष्ट कलावंत आजही शासनाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असून त्यांच्या कलेला योग्य व्यासपीठ मिळत नाही. महाराष्ट्राची लोकसंस्कृती जपणारे हे कलावंत खेडोपाडी, डोंगरदऱ्यांत आपल्या कला जिवंत ठेवत आहेत. अशा कलाकारांना प्रोत्साहन आणि सन्मान मिळावा, यासाठी शिर्डीत साईबाबांच्या चरणी हा लोककला महामेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या महामेळाव्यात आदिवासी नृत्य, पारंपरिक नृत्य, बोहडा नृत्य, वाजंत्री, बँड पथक, भजनी मंडळे, जागरण-गोंधळ, भेदिक कव्वाली, तमाशा तसेच विविध लोककला प्रकारांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. राज्यभरातील शेकडो ग्रामीण कलावंत आपल्या कला सादर करून समाजप्रबोधनाचा संदेश देणार आहेत.
सदर सोहळा ३ जून रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत श्री साईबाबा मंदिराच्या तीन नंबर गेटजवळ आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमादरम्यान अनेक ग्रामीण कलावंतांचा विशेष सन्मानही करण्यात येणार आहे.या लोककला महोत्सवात सहभागी होण्यासाठी ग्रामीण भागातील सर्व कलावंतांनी आपल्या कला साहित्यांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन गवनेरजी सरोदे यांनी केले आहे
