निकाल प्रलंबित ठेऊन फेरपरीक्षेचा सल्ला; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात
तळेरे | प्रतिनिधी…..कणकवली तालुक्यातील हुमरठ येथे सुरू असलेल्या बी.एन. विजयकर इंटरनॅशनल स्कूलमधील बारावीच्या आय.एस.सी. दिल्ली बोर्डाच्या परीक्षेला बसलेल्या दहा विद्यार्थ्यांचा निकाल अद्यापही जाहीर न झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ३० एप्रिल रोजी बारावीचा निकाल जाहीर होऊन जवळपास एक महिना उलटूनही संबंधित विद्यार्थ्यांचा निकाल बोर्डाच्या वेबसाईटवर उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला लागले आहे. याप्रकरणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळा प्रशासनाकडे तक्रार केली असता समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने संतप्त पालकांनी ह्यूमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन संघटनेकडे धाव घेतली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बी.एन. विजयकर इंटरनॅशनल स्कूलमधील दहा विद्यार्थी यावर्षी आय.एस.सी. दिल्ली बोर्डाच्या बारावी परीक्षेला बसले होते. बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर इतर विद्यार्थ्यांचे निकाल उपलब्ध झाले; मात्र या दहा विद्यार्थ्यांचे निकाल प्रलंबित ठेवण्यात आले. विशेष म्हणजे, निकाल प्रलंबित ठेवण्यामागील कारणाबाबत विद्यार्थ्यांना अथवा पालकांना कोणतीही अधिकृत लेखी माहिती देण्यात आलेली नाही.
पालकांनी शाळा प्रशासनाकडे विचारणा केली असता विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेत एकसारखी उत्तरे लिहिल्याच्या संशयावरून बोर्डाने फेरतपासणी सुरू केली असून फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेतल्याचे तोंडी सांगण्यात आले. मात्र बोर्डाने कोणत्या निकषांवर हा निर्णय घेतला, कोणते पुरावे तपासले किंवा याबाबत अधिकृत आदेश काय आहेत, याची कोणतीही लेखी कागदपत्रे शाळेकडून उपलब्ध करून देण्यात आलेली नाहीत.
या प्रकारामुळे संबंधित विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली आहे. निकाल उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षा, व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश अर्ज तसेच पुढील शिक्षणाच्या प्रक्रियेत सहभागी होता येत नसल्याने त्यांचे संपूर्ण शैक्षणिक वर्ष धोक्यात आले आहे.
दरम्यान, या विद्यार्थ्यांना फेरपरीक्षा देण्याचा सल्ला शाळेच्या ट्रस्टी अमृता रेडकर यांनी दिल्याचा आरोप पालकांनी केला आहे. फेरपरीक्षेसाठी प्रत्येकी ५ हजार ४५० रुपये शुल्क भरावे लागणार असल्याने पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. “विद्यार्थ्यांची कोणतीही चूक नसताना त्यांच्यावर आर्थिक भुर्दंड का लादला जात आहे?” असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे.
याप्रकरणी ह्यूमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन संघटनेने आक्रमक भूमिका घेतली असून संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांनी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, जिल्हा परिषद अध्यक्ष, कणकवली तहसीलदार तसेच शिक्षणाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. दोषींवर कठोर कारवाई करून विद्यार्थ्यांना तातडीने न्याय द्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
याच पार्श्वभूमीवर संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक व सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हा समन्वयक प्रणय बांदिवडेकर यांनी बी.एन. विजयकर इंटरनॅशनल स्कूलचे सेक्रेटरी विवेक विजयकर यांची भेट घेतली. यावेळी संपूर्ण प्रकरणाची आठ दिवसांच्या आत लेखी माहिती देण्याची मागणी करणारे निवेदन शाळा प्रशासनाला देण्यात आले.
या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांचे पालक किशोर ठाकरे, कालिदास परब, सौ. परब, सौ. श्रुती सावंत, सौ. देवळेकर, सौ. उमा पवार, पार्थ पवार आदी उपस्थित होते. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून संबंधित विद्यार्थ्यांना न्याय मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
