पिंपरी-चिंचवड : चिखली परिसरातील संविधान चौक येथे जुन्या वादातून एका युवकावर लोखंडी कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय रवि कांबळे (वय २८, रा. अजिंठानगर सी पत्राशेड, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. दि. २६ मे २०२६ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास संविधान चौक, चिखली येथे आरोपी अमित तानाजी जानराव याने फिर्यादीला भेटण्यासाठी बोलावले होते.
भेटीनंतर आरोपीने विनाकारण संताप व्यक्त करत लोखंडी कोयत्याने विजय कांबळे यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्यावर, डाव्या हाताच्या पंजावर, उजव्या हाताच्या मधल्या बोटावर तसेच मनगटाजवळ गंभीर दुखापत झाली.
या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३४०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ११८ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर आरोपी फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लांडगे करीत आहेत.