पिंपरी-चिंचवड…… शहरातील भक्ती-शक्ती उड्डाणपूलाखाली श्रीकृष्ण मंदिर ते निगडी गावठाण मुंबई-पुणे महामार्ग परिसरात मेट्रो रेल्वेचे काम सुरू आहे. या कामादरम्यान जेसीबी मशीनद्वारे उत्खनन करत असताना पाणीपुरवठ्याची मुख्य पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. या घटनेमुळे परिसरातील पाणीपुरवठा तातडीने बंद करण्यात आला होता.
निगडी गावठाण, यमुनानगर, साईनाथनगर, लक्ष्मीनगर आदी भागातील नागरिकांना यामुळे मोठा त्रास सहन करावा लागला. अचानक पाणीपुरवठा बंद झाल्यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सदर ठिकाणी मेट्रो रेल्वेच्या कामादरम्यान यापूर्वीदेखील अनेक वेळा पाणी पाईपलाईन फुटून मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र संबंधित ठेकेदाराकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त यांनी या घटनेची तात्काळ दखल घेऊन संबंधित मेट्रो रेल्वे ठेकेदाराविरोधात कडक कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात, अशी नागरिक व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी नम्र मागणी करण्यात येत आहे.
