पुणे : भुकूम परिसरात टेम्पो आणि दुचाकीचा किरकोळ अपघात झाल्यानंतर संतप्त झालेल्या दोन तरुणांनी टेम्पो चालकाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार २४ मे २०२६ रोजी रात्री सुमारे ८.४५ वाजण्याच्या सुमारास मानस मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसमोर, भुगांव ते पौड रोडवरील भुकूम (ता. मुळशी, जि. पुणे) येथे घडला. याप्रकरणी २५ मे रोजी पहाटे ३.५८ वाजता गुन्हा नोंदविण्यात आला.
या प्रकरणात रोहित रघुनाथ घारे (वय १९, रा. निकटे आळी, भैरवनाथ मंदिराजवळ, पिरंगुट) याच्यासह श्लोक रावल आणि मोहित शर्मा (दोघे रा. वनालिका अपार्टमेंट, पिरंगुट) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.
फिर्यादी हे त्यांचा मारुती सुझुकी कंपनीचा सुपर कॅरी टेम्पो (एमएच-१२-एक्सएम-२०७४) घेऊन जात असताना आरोपींच्या टीकेएस कंपनीच्या अपाची दुचाकीला (क्रमांक जीकेटी-०२-२-७५६७) धक्का लागून दुचाकीस्वार खाली पडले. या कारणावरून आरोपी संतप्त झाले.
आरोप आहे की, आरोपी रोहित घारे याने फिर्यादीच्या टेम्पोची समोरील काच फोडून शिवीगाळ व दमदाटी केली तसेच स्टीलच्या कड्याने मारहाण केली. दुसरा आरोपी मोहित शर्मा यानेही शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत दुखापत केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.