पिंपरी-चिंचवड, दि. २६ मे २०२६ : खेड तालुक्यातील काळूस गावात सुरू असलेल्या पत्त्यांच्या जुगार अड्ड्यावर उत्तर चाकण पोलिसांनी छापा टाकून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत रोख रक्कम आणि जुगार साहित्य जप्त करण्यात आले.
उत्तर चाकण पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार, दि. २५ मे २०२६ रोजी रात्री ९.५० वाजण्याच्या सुमारास मौजे काळूस, ता. खेड, जि. पुणे येथे काही व्यक्ती एका लाईटच्या उजेडात गोलाकार बसून “तिरट” नावाचा पत्त्यांचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला.
या प्रकरणी पोलीस शिपाई महेश शत्रुष्न कोळी यांनी फिर्याद दिली असून उत्तर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४४८/२०२६ अन्वये मुंबई जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील आरोपींमध्ये संभाजी शिवाजी पोटवडे (वय ४५), परमेश्वर कैलास पवळे (वय २९), संतोष सहादु पोटवडे (वय ३०) आणि ज्ञानेश्वर पांडुरंग पवळे (वय ३७, सर्व रा. काळूस, ता. खेड, जि. पुणे) यांचा समावेश आहे.
पोलिसांनी आरोपींकडून एकूण ३ हजार ५० रुपये रोख रक्कम तसेच पत्ते असा जुगार साहित्य जप्त केले आहे. अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नसून पुढील तपास पोलीस हवालदार ढमढेरे करीत आहेत.