पिंपरी : संत तुकारामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तडीपार आदेशाचा भंग करून धारदार कोयता जवळ बाळगणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई २५ मे २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७.५० वाजण्याच्या सुमारास हिन्दुस्तान अॅन्टीबायोटीक कंपनीच्या मोकळ्या मैदान परिसरात करण्यात आली.
या प्रकरणी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २२६/२०२६ दाखल करण्यात आला असून आरोपीवर भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२, ३७(१)(३) सह १३५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलीस शिपाई भागवत गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिनेश गोरख माने (वय ३१, रा. साईबाबा मंदिर शेजारी, विटकर चाळ, नेहरूनगर, पिंपरी) याला अटक करण्यात आली आहे.
आरोपीस पिंपरी चिंचवड, पुणे शहर व पुणे ग्रामीण पोलीस हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. मात्र कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता त्याने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत प्रवेश केला. तसेच घातक शस्त्र बाळगण्यास मनाई आदेश लागू असतानाही आरोपीकडे सुमारे ४०० रुपये किमतीचा धारदार लोखंडी कोयता आढळून आला.सदर कारवाई पोलीस हवालदार आसवले यांनी केली असून पुढील तपास संत तुकारामनगर पोलीस करीत आहेत.