पिंपरी-चिंचवड : रावेत परिसरातील एका कॅफेमध्ये परवानगीशिवाय तरुण-तरुणींना अश्लील कृत्यांसाठी जागा उपलब्ध करून दिल्याचा प्रकार उघडकीस आला असून, रावेत पोलिसांनी कॅफे मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १७६/२०२६ अन्वये महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२९ व १३१(अअ) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. ही घटना दि. २५ मे २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजण्यापूर्वी डॉमिनोज पिझ्झा जवळील ब्लुमिंग डेल अपार्टमेंटमधील “क्रेझी लव्हर्स कॅफे” येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित कॅफेमध्ये कोणताही वैध परवाना नसताना व्यवसाय सुरू होता. तसेच कॅफेच्या वरच्या मजल्यावर अंधाऱ्या खोलीत मुलामुलींना बसण्यासाठी व अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार छापा टाकून कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी पोलीस शिपाई अशोक बालासाहेब वाघमारे (नेमणूक : दहशतवाद विरोधी शाखा, पिंपरी-चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून कॅफेचा मालक कैलास किसन काशिद (वय २४, रा. शिवशंभो हौसिंग सोसायटी, रावेत) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार पी. ए. शेलार करीत आहेत।
