पिंपरी, दि. २६ मे २०२६ – सांगवी फाटा ते किवळे मार्गावरील रक्षक चौक येथे उभारण्यात आलेल्या भुयारी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले असून सध्या पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू करण्यात आली आहे. प्रकल्पातील सर्व सुरक्षा निकष पूर्ण करण्यात आल्याची माहिती पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य प्रकल्प विभागाने दिली आहे.
या प्रकल्पासाठी नियुक्त प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार संस्थेमार्फत सुरक्षा तपासणी करण्यात आली असून वाहतूक सुरक्षिततेचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी वाहतूक मंत्रालय आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे नोंदणीकृत मान्यताप्राप्त सुरक्षा लेखापरीक्षण सल्लागार संस्थेचीही नियुक्ती करण्यात आली होती. संबंधित संस्थेकडून प्रत्यक्ष पाहणी, सर्वेक्षण आणि सखोल अभ्यासानंतर आवश्यक सुरक्षा उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत.
भुयारी मार्ग आणि त्यास जोडलेल्या रॅम्पवर वाहनांना ओव्हरटेक करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच इंडियन रोड काँग्रेसच्या मानकांनुसार ताशी ३० किलोमीटर वेगमर्यादा दर्शविणारे फलक विविध ठिकाणी बसविण्यात आले आहेत.
भुयारी मार्ग व दोन्ही बाजूंच्या रॅम्पवर संथगती वाहने, सायकलस्वार आणि पादचारी यांना प्रवेश बंद करण्यात आला असून त्यांच्यासाठी स्वतंत्र सेवा रस्त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. हा मार्ग केवळ मोटार वाहनांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. बीआरटीएससाठी स्वतंत्र मार्गिकाही निश्चित करण्यात आली असून त्यासाठीही ताशी ३० किलोमीटर सुरक्षित वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
वाहनांचा वेग नियंत्रित राहावा यासाठी उताराच्या रस्त्यांवर भारतीय मानांकनानुसार आडव्या पट्ट्यांचे चिन्हांकन करण्यात आले आहे. तसेच मार्ग एकत्र येणाऱ्या, विभाजित होणाऱ्या आणि धोकादायक ठिकाणी वाहनचालकांना सतर्क करण्यासाठी सौरऊर्जेवर चालणारे पिवळे दिवे बसविण्यात आले आहेत.
रात्रीच्या वेळी दृश्यमानता वाढविण्यासाठी संरक्षक कठड्यांवर प्रकाश परावर्तित करणारे मध्यदर्शक बसविण्यात आले असून संपूर्ण पुलावर वेगमर्यादा दर्शविणारे वाहतूक नियंत्रण फलक लावण्यात आले आहेत.
“सांगवी-किवळे रस्त्यावरील रक्षक चौक येथील भुयारी मार्गाच्या दोन्ही रॅम्पसंदर्भातील सुरक्षा तपासणीतील सर्व बाबी पूर्ण करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी या मार्गावर ताशी ३० किलोमीटर वेगमर्यादेचे पालन करावे तसेच वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळावेत.”
— प्रमोद ओंभासे, मुख्य अभियंता, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
“रक्षक चौक येथील भुयारी मार्गाचे काम पूर्णत्वाकडे आले असून सध्या पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे. वाहतूक कोंडी कमी होऊन अडथळाविरहित प्रवासासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे. नागरिकांनी वेगमर्यादा आणि वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे. तसेच खासगी वाहनांनी बीआरटीएस मार्गिकेत प्रवेश करू नये.”
— कुलदीप जंगम, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
