पिंपरी : शासनाने आयटीआयमधील व्यवसाय अभ्यासक्रमांना इयत्ता १२ वीची समकक्षता दिली असून त्यासाठी मराठी व इंग्रजी हे विषय उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १२ वी परीक्षेच्या निकालात महापालिकेच्या आयटीआय मोरवाडी संस्थेने ८४.५१ टक्के निकालाची उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे.
या परीक्षेस संस्थेतील एकूण ७१ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
संस्थेतील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये ऋषिकेश आंबावले (मोटार मेकॅनिकल ट्रेड) याने ८१.६७ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. सार्थक कुमकर (मोटार मेकॅनिकल ट्रेड) याने ७८.५० टक्के गुणांसह द्वितीय, तर निशित सुरवसे (मोटार मेकॅनिकल ट्रेड) याने ७४.५० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला.
विद्यार्थ्यांच्या यशामागे निदेशक अमोल शिंदे तसेच गटनिदेशक (सेवानिवृत्त) राजकुमार तिकोणे यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे निदेशक विक्रम काळोखे, मुख्य लिपिक विजय भैलुमे आणि लिपिक विजय चावरिया यांनी परीक्षेसंदर्भातील संपूर्ण कामकाज पाहिले.प्राचार्य शशिकांत पाटील यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रोत्साहनपर बक्षीस देऊन सत्कार केला तसेच त्यांच्या पुढील शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
