पिंपरी.….पिंपरी-चिंचवड शहरातील रक्षक चौक येथे नव्याने बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलावर एका भरधाव चारचाकी वाहनाचा अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या वाहन चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर उड्डाणपुलाच्या सुरक्षिततेबरोबरच त्याच्या डिझाइनवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रक्षक चौक येथे हा नवीन उड्डाणपूल उभारला आहे. मात्र, अद्याप या उड्डाणपुलाचे अधिकृत उद्घाटन झालेले नाही. तरीदेखील पूल पूर्णत्वास आल्याने पुणे व पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांकडून त्याचा वापर सुरू आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, उड्डाणपुलावरील वळण, उंची तसेच सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत यापूर्वीपासूनच चर्चा सुरू होती. उद्घाटनापूर्वीच झालेल्या या अपघातामुळे पुलाच्या रचनेबाबत आणि सुरक्षेच्या निकषांबाबत नव्याने प्रश्न उपस्थित होत आहेत.
या घटनेनंतर नागरिकांनी प्रशासनाकडे उड्डाणपुलाची तांत्रिक तपासणी करून सुरक्षा उपाययोजनांचा आढावा घेण्याची मागणी केली आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक त्या सुधारणा तातडीने कराव्यात, अशीही मागणी स्थानिकांकडून होत आहे.
