पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे निलख येथील रक्षक चौक उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्याने तो तात्काळ वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी आमदार शंकर जगताप यांच्यासह स्थानिक नागरिक, व्यापारी आणि वाहनचालकांकडून करण्यात येत आहे. संबंधित मागणीबाबत प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.
आमदार शंकर जगताप यांनी निवेदनात म्हटले आहे की, रक्षक चौकातील उड्डाणपूल प्रकल्पामुळे परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार असून औंध ते सांगवी फाटा तसेच रावेत ते किवळेपर्यंतचा प्रवास अधिक वेगवान आणि सिग्नलमुक्त होण्यास मदत होणार आहे. उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असले तरी अंडरपासचे काम अद्याप सुरू आहे. दरम्यान, या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने नागरिकांना वाहतूक कोंडी, वेळेचा अपव्यय आणि गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे उड्डाणपूल तात्काळ वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी केली आहे. तसेच अंडरपासचे उर्वरित काम जलदगतीने पूर्ण करून तोही नागरिकांसाठी सुरू करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, संबंधित विभागाने आवश्यक तांत्रिक तपासणी, सुरक्षाविषयक ऑडिट आणि इतर उपाययोजना पूर्ण करून नागरिकांच्या हिताचा विचार करत उड्डाणपूल सार्वजनिक वापरासाठी खुला करावा. यामुळे औंध बीआरटी मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होऊन वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होणार असल्याचे नागरिकांनी सांगितले.