नागरिकांचा नगरपालिकेवर संताप
राहुरी प्रतिनिधी : अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी शहर हे व्यापारी दृष्ट्या महत्त्वाचे केंद्र मानले जात असून शहरातील बाजारपेठ दिवसेंदिवस विस्तारत आहे. ग्रामीण भागातील हजारो नागरिक, शेतकरी व व्यापारी दररोज खरेदीसाठी राहुरी शहरात येत असतात. मात्र शहरामध्ये मूलभूत सुविधांचाच अभाव असल्याने नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
विशेषतः सार्वजनिक मुतारींची अत्यंत अपुरी व्यवस्था असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. शहरात जुना सरकारी दवाखाना परिसरात एकच सार्वजनिक मुतारी असून तिची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. नियमित स्वच्छता होत नसल्याने त्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले असून दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. महिलांची तर अधिकच कुचंबणा होत असून सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या वाढवण्याची मागणी जोर धरत आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, राहुरी नगरपालिका क्षेत्रामध्ये जागोजागी सार्वजनिक मुतारी व स्वच्छतागृहे उभारणे अत्यावश्यक झाले आहे. बाजारपेठ मोठी असतानाही सुविधा अपुऱ्या असल्याने शहराच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. “राहुरी शहर अधोगतीकडे चालले आहे काय?” असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
दरम्यान, शहरातील शनी चौकासह विविध चौकांमध्ये मोठ्या प्रमाणावर फ्लेक्स झळकत असल्याने शहराचे विद्रूपीकरण होत असल्याची नाराजीही व्यक्त केली जात आहे. तसेच अनेक पेठांमधील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली असून ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
नागरिकांनी नगरपालिकेकडे सार्वजनिक स्वच्छतागृहे, मुतारी, स्वच्छता व्यवस्था, फ्लेक्स नियंत्रण तसेच खड्डेमय रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. शहरातील मूलभूत सुविधा सुधारण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.
