पिंपरी : प्रभाग क्रमांक ११ मधील मैलाशुद्धीकरण (जॉगर्स पार्क) प्रकल्प परिसरात झालेल्या अनधिकृत बांधकाम व मोठ्या प्रमाणातील बेकायदा वृक्षतोडीप्रकरणी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर प्रशासकीय तसेच फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती साहेबराव भापकर यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
भापकर यांनी दिलेल्या निवेदनानुसार, जॉगर्स पार्कच्या जागेत सुमारे २०० ते २५० झाडांची बेकायदेशीर कत्तल करून मागील पाच महिन्यांपासून अनधिकृत आरसीसी बांधकाम सुरू होते. या प्रकाराबाबत स्थानिक नगरसेवक योगिता नागरगोजे, निलेश नेवाळे, रिटा सानप, कुंदन गायकवाड तसेच विविध पर्यावरणवादी संघटनांनी वेळोवेळी महापालिकेकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र प्रशासनाने या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या बांधकामासंदर्भात आमदार महेश लांडगे यांनी आमदार निधीतून काम करण्याबाबत पत्र दिले होते. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या एका कार्यक्रमात माजी महापौर मंगलाताई कदम यांनी या प्रकरणावरून आमदार लांडगे यांच्या उपस्थितीत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या वादाचे पडसाद प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये उमटले होते.
यानंतर महापालिका प्रशासनाने संबंधित जॉगर्स पार्क परिसरातील सुमारे १५०० चौ.मी. क्षेत्रावरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली. मात्र, या अनधिकृत बांधकाम व वृक्षतोडीस जबाबदार अधिकारी-कर्मचाऱ्यांवर अद्याप कोणतीही कठोर कारवाई झालेली नसल्याचे भापकर यांनी नमूद केले आहे.या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
