पिंपरी : संत तुकारामनगर मेट्रो रेल्वे स्टेशनजवळ भरधाव ट्रकने पाणी टँकरला जोरदार धडक दिल्याने एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. २१ मे) सकाळी घडली. या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे.
याबाबत गणेश शंकर जाधव (वय ३६, रा. दापोडी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी नरेशकुमार सुरेंद्र दास (वय २४, रा. पेंदरगाव, ता. पनवेल, जि. रायगड, मूळ रा. मधुबनी, बिहार) याच्याविरोधात भा.न्या.संहिता २०२३ चे कलम २८१, १०६(१), ३२४(४) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४, ११९/११७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश जाधव हे मेट्रो रेल्वे पिलर क्रमांक केपी-३३५ जवळ झाडांना टँकरद्वारे पाणी टाकत होते. त्यावेळी मागून येणारा एमएच ४३ / बीजी-३०२० क्रमांकाचा ट्रक चालक आरोपीने भरधाव व निष्काळजीपणे चालवत टँकरला जोरदार धडक दिली. या अपघातात टँकरचे नुकसान झाले तसेच फिर्यादींसोबत काम करणारा शामसुंदर शेषराम गौतम (वय २२, रा. दापोडी, पुणे) हा गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि लोहार करीत आहेत.