पिंपरी : संत तुकारामनगर परिसरात म्हाडाचे रो-हाऊस खरेदी करून देण्याचे आमिष दाखवून तब्बल ७४ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मार्च २०२४ ते २१ मे २०२६ या कालावधीत संत तुकारामनगर, पिंपरी येथे घडला.
याप्रकरणी पुनम रामप्रसाद शर्मा (वय ४४, रा. संत तुकारामनगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रदीप मारुती मोपलघरे (रा. कोथरूड, पुणे), गोकुळ नामदेव माहिते (रा. आंबेगाव खुर्द, पुणे), निखील अंबाजी पवार (वय ३५, रा. खराळवाडी, पिंपरी) आणि कुलदीप सिंग मोहिंदर सिंग एधी (वय ५६, रा. संत तुकारामनगर, पिंपरी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून संत तुकारामनगर येथील ययाती गल्ली क्रमांक १ मधील बेबील १४ नंबरचे म्हाडाचे रो-हाऊस खरेदी करून देण्याचे आमिष फिर्यादी व त्यांच्या पतीला दाखवले. त्यानंतर विश्वास संपादन करून आरोपींनी वेळोवेळी रोख रक्कम तसेच ऑनलाईन व्यवहाराद्वारे एकूण ७४ लाख २० हजार रुपये घेतले. मात्र, घर खरेदी करून न देता फिर्यादींची फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २१४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३१८(४), ३१६(२), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि पांडे करीत आहेत.