लोकसेवक युवराज दाखले यांची घोषणा
मुंबई, दि. २२ मे २०२६ : “सत्तेसाठी नाही, तर सर्वसामान्यांच्या सेवेसाठी” हे ब्रीदवाक्य घेऊन लोकसेवक युवराज भगवान दाखले यांनी आज ‘शिवशाही शासन’ या नव्या राजकीय पक्षाची अधिकृत घोषणा केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रयतेच्या राज्याच्या संकल्पनेतून तसेच लहुजी वस्ताद साळवे यांच्या समतेच्या विचारांतून प्रेरणा घेत हा पक्ष स्थापन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना युवराज दाखले म्हणाले की, “गेली ७० वर्षे प्रस्थापित पक्षांनी गरीब, कष्टकरी, शेतकरी, कामगार, मातंग, बहुजन समाज, तृतीयपंथी भगिनी आणि व्यापारी वर्गाचा केवळ मतांसाठी वापर केला. शिक्षणाचे व्यापारीकरण, बेरोजगारी आणि अस्वच्छतेमुळे महाराष्ट्रातील सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. वंचित घटकांना सत्तेत योग्य प्रतिनिधित्व मिळवून देण्यासाठी ‘शिवशाही शासन’ मैदानात उतरले आहे.”
पक्षाने जाहीर केलेल्या पाच प्रमुख भूमिका पुढीलप्रमाणे आहेत:
*शिक्षण: खासगी क्लासेसची लूट थांबवून सरकारी शाळा सक्षम करणे तसेच SC/ST/OBC/NT/VJNT विद्यार्थ्यांसाठी मोफत उच्च शिक्षण.
*रोजगार: प्रत्येक घरात एक नोकरी देण्याचा संकल्प तसेच तृतीयपंथी, विधवा आणि दिव्यांगांसाठी विशेष योजना.
*स्वच्छता व आरोग्य: “नालामुक्त-रोगमुक्त महाराष्ट्र” अभियान राबवून प्रत्येक प्रभागात मोफत दवाखाने सुरू करणे.
*शेतकरी-कामगार-व्यापारी हित: शेतमालाला हमीभाव, कामगारांना किमान २५ हजार रुपये वेतन आणि व्यापाऱ्यांवरील जाचक अटी रद्द करणे.
*स्वाभिमान: डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णा भाऊ साठे आणि इतर महापुरुषांच्या विचारांवर आधारित वंचितांना सन्मान व सत्तेत सहभाग देणे.
“हा पक्ष नेत्यांचा नसून कार्यकर्ते आणि जनतेचा असेल. ‘शिवशाही शासन’ म्हणजे सेवेचे शासन,” असेही युवराज दाखले यांनी स्पष्ट केले.पक्षाचे चिन्ह आणि अधिकृत निशाणी लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
शेवटी त्यांनी “जो वंचितांच्या बाजूने उभा राहील, तोच शिवशाही शासनाचा सच्चा सैनिक असेल. आता महाराष्ट्रात एकच नारा — जय शिवराय, जय लहुजी!” असे आवाहन केले.
