पिंपरी-चिंचवड, दि. २१ मे :शिवशाही व्यापारी संघाने तृतीयपंथी समाजाच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत “तृतीयपंथी भगिनी आघाडी” स्थापन केली असून, या आघाडीच्या प्रदेश अध्यक्षपदी श्री. आकाश दत्तु शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष युवराज भगवान दाखले यांनी ही घोषणा केली.
यावेळी बोलताना युवराज दाखले म्हणाले की, समाजातील वंचित आणि दुर्लक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिवशाही व्यापारी संघ सातत्याने कार्यरत आहे. तृतीयपंथी भगिनींना सन्मानाने जगता यावे, त्यांना रोजगार, व्यवसाय आणि शासकीय योजनांचा लाभ मिळावा या उद्देशाने या आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. आकाश शिंदे हे तळागाळातील प्रश्नांची जाण असलेले कार्यकर्ते असून त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर संघटन मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नवनियुक्त प्रदेश अध्यक्ष आकाश दत्तु शिंदे यांनी संघटनेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानत, तृतीयपंथी समाजाला भिक्षा मागण्याची वेळ येऊ नये यासाठी रोजगारनिर्मिती, व्यवसायासाठी मदत, कर्ज सुविधा आणि शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यावर भर देणार असल्याचे सांगितले. “सन्मानाने जगा, स्वाभिमानाने कमवा” हा मंत्र घेऊन काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शिवशाही व्यापारी संघाच्या तृतीयपंथी भगिनी आघाडीमार्फत रोजगार व स्वयंरोजगार, सामाजिक सुरक्षा, शिक्षण, आरोग्य सुविधा तसेच जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. ब्युटी पार्लर, शिवणकाम, बचत गट, फूड स्टॉल यांसारखे व्यवसाय उभे करण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार असून, आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यावरही भर दिला जाणार आहे.
युवराज दाखले यांनी पुढे सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लहुजी वस्ताद साळवे आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन संघटना सर्व वंचित घटकांना न्याय देण्यासाठी कार्य करत आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात या आघाडीचे काम पोहोचविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. तसेच सरकारने तृतीयपंथी समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे, अशी मागणीही त्यांनी केली.
