जालना, प्रतिनिधी : तालुक्यातील दरेगाव येथील वनीकरण क्षेत्रात झालेल्या कैलास दत्तू पवार यांच्या खून प्रकरणातील फरार असलेल्या दोन महिला आरोपींना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इंदेवाडी (जि. जालना) येथील रहिवासी कैलास दत्तू पवार यांचा १७ ते १९ एप्रिल २०२६ दरम्यान दरेगाव शिवारातील वनीकरण क्षेत्रात निर्घृण खून करण्यात आला होता. याप्रकरणी मृताची पत्नी मिनाबाई पवार यांनी जालना तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार विकी मांडोळे, शुभम साळवे, ममता राहुल साळवे आणि साक्षी राहुल साळवे यांच्याविरोधात गुन्हा रजिस्टर क्रमांक १९१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०३(१), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी विशेष पथक तयार केले होते. दि. २१ मे रोजी पथकाला गुप्त माहिती मिळाली की, आरोपी ममता कैलास पवार ऊर्फ ममता राहुल साळवे (वय ४२) आणि साक्षी राहुल साळवे (वय २३, दोन्ही रा. रमाबाई नगर, जालना) या मानेगाव येथे लपून बसल्या आहेत.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी मानेगाव येथे सापळा रचून दोन्ही महिला आरोपींना ताब्यात घेतले. त्यानंतर पुढील तपासासाठी त्यांना जालना तालुका पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू, अप्पर पोलीस अधीक्षक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खामगळ, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांच्यासह प्रभाकर वाघ, ईरशाद पटेल, सागर बाविस्कर, दत्ता वाघुंडे, अशोक जाधवर, रेणुका बांडे आणि अरुणा गायकवाड यांनी सहभाग घेतला.
