जालना, प्रतिनिधी : राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटखा व सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर जालना पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ३३ लाख ५० हजार ५१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून मुख्य सूत्रधाराचाही तपासात उलगडा झाला आहे.
पोलीस अधीक्षक तेघबीर सिंग संधू यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर येथून बोलेरो पिकअप वाहनाद्वारे मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा जालना जिल्ह्यात आणला जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार चंदनझिरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.
ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक जान्व्ही शेखर, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि स्नेहा करेवाड, उपनिरीक्षक रवि देशमाने व त्यांच्या पथकाने केली. या प्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
दि. २० मे २०२६ रोजी दुपारी ३.५० वाजण्याच्या सुमारास बदनापूर तालुक्यातील सोमठाणा फाटा येथे पोलिसांनी सापळा रचला. संशयित बोलेरो पिकअप (एमएच-२१ बीएच-४७३२) अडवून झडती घेतली असता वाहनात विमल पान मसाला, राजनिवास, जाफरानी जर्दा आणि व्ही-१ तंबाखूचा मोठा साठा आढळून आला.
या कारवाईत पोलिसांनी हृषिकेश काकासाहेब कताडे (वय २६, रा. खांडी अंतरवाली, ता. पैठण) आणि अशोक शिवाजी तायडे (वय ३०, रा. रामसगाव, ता. घनसावंगी) यांना ताब्यात घेतले. चौकशीत हा माल ताराचंद भागुजी भोजने (रा. जामखेड, ता. अंबड) याने विक्रीसाठी मागवल्याचे निष्पन्न झाले.
