मावळ दिं.१९ मे …..मावळ तालुक्यातील दारूंबे येथे शेतीच्या बांधाच्या वादातून मारहाणीची घटना घडली असून, एका शेतकऱ्याच्या हाताला फ्रॅक्चर झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १९ मे २०२६ रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास जमिन गट क्रमांक ४२८, दारूंबे (ता. मावळ, जि. पुणे) येथे घडली. याप्रकरणी शरद बाजीराव वाघोले (वय ४५, व्यवसाय शेती, रा. दारूंबे ता. मावळ) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, शरद वाघोले व त्यांची पत्नी हे बाजरी पिकाची कापणी करत असताना आरोपी योगेश दगडू वाघोले हा तेथे आला. त्याने ट्रॅक्टर चालक नंदू सोरटे याला “माझे क्षेत्र कमी आहे, ट्रॅक्टरने बांध फोड,” असे सांगितले. मात्र, फिर्यादी व त्यांच्या पत्नीने संबंधित जमीन वाद न्यायालयात सुरू असल्याने मोजणी झाल्यानंतरच निर्णय घेण्याचे सांगितले.
यावरून आरोपी संतप्त झाला आणि त्याने फिर्यादीस शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. तसेच जवळील लाकडी काठीने शरद वाघोले यांच्या डाव्या हाताच्या पंजावर जोरात मारहाण केली. या मारहाणीत त्यांच्या हाताचे हाड फ्रॅक्चर होऊन गंभीर दुखापत झाली.
या प्रकरणी १९ मे रोजी रात्री १०.२६ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार भुजबळ करीत आहेत.