पिंपरी, दि. १९ मे २०२६ : साहित्य, कविता आणि अभिवाचन रसिकांसाठी एक आगळीवेगळी पर्वणी ठरणारी ‘लागले खूळ कलावंताला…’ ही विशेष अभिवाचन मैफल रविवार, २४ मे रोजी निगडी येथे रंगणार आहे. रुद्रंग, निगडी, पुणे संस्थेच्या बाराव्या वर्धापनदिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सायंकाळी ५.३० वाजता कॅप्टन कदम सभागृह, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, पेठ क्रमांक २५, निगडी प्राधिकरण येथे होणाऱ्या या मैफलीचे निर्माते रमेश यशवंत आहेत. गोविंदाग्रज उर्फ राम गणेश गडकरी आणि गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर यांच्या जयंतीनिमित्त या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाला चिखली येथील प्रज्ञानप्रबोधिनी शैक्षणिक संस्थेचे कार्यवाह यादवेंद्र जोशी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच नागेश जोशी, उज्ज्वला केळकर, सागर यादव, किशोरी सरीन, अरुणा वाकनीस, डॉ. हेमंत हुईलगोळकर, स्मिता कुलकर्णी आणि रमेश वाकनीस हे विविध साहित्यप्रकारांचे अभिवाचन सादर करणार आहेत.
साहित्य, कला आणि अभिवाचनाचा अनोखा संगम अनुभवण्याची संधी या कार्यक्रमातून रसिकांना मिळणार असून हा कार्यक्रम सर्वांसाठी विनाशुल्क खुला आहे. अधिकाधिक रसिकांनी उपस्थित राहून या अभिवाचन मैफलीचा लाभ घ्यावा, असे आवाहन रुद्रंग आणि अनुसंधान कला संस्था परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.