पिंपरी, पुणे (दि. १८) : आगामी जनगणना २०२६-२७ अंतर्गत पिंपरी-चिंचवड शहरात घर यादी व घरगणना मोहिमेला शनिवारी सुरुवात करण्यात आली. अ प्रभाग क्षेत्रातील चिंचवड स्टेशन परिसरातील आनंद नगर भागात या मोहिमेची सुरुवात झाली असून ही मोहीम १४ जूनपर्यंत चालणार आहे.
या कालावधीत महापालिकेचे पर्यवेक्षक व प्रगणक घरोघरी भेट देऊन नागरिकांची आवश्यक माहिती संकलित करणार आहेत. नागरिकांनी अचूक व संपूर्ण माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, महापौर रवी लांडगे आणि उपायुक्त सचिन पवार यांनी केले आहे.
महापालिकेकडून या मोहिमेसाठी मोठ्या प्रमाणात कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून प्रभाग क्रमांक १९ मध्ये पर्यवेक्षक म्हणून प्रवीण माळी कार्यरत आहेत. तसेच प्रगणक म्हणून बाळू महाजन, दत्तात्रय वाघ, जुबेर अली मुजाफ्फर, राहुल मोरे आणि काजल खैरनार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहरभरात सुमारे सहा हजार प्रगणक व पर्यवेक्षक कार्यरत असून प्रत्येक प्रगणकाकडे सुमारे २०० घरांची जबाबदारी देण्यात आली आहे.
सर्व माहिती मोबाईलद्वारे ऑनलाईन पद्धतीने नोंदवली जात असून ओळखपत्रधारक प्रगणक नागरिकांच्या घरी भेट देणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी खात्री करून त्यांना सहकार्य करावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जनगणना ही देशाच्या विकासासाठी महत्त्वाची प्रक्रिया मानली जाते. अचूक माहितीच्या आधारे शासनाला विविध योजनांचे नियोजन प्रभावीपणे करता येते. तसेच विकासाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यास मदत होते. त्यामुळे नागरिकांनी जबाबदारीने व प्रामाणिकपणे माहिती देऊन या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
महापालिकेने स्पष्ट केले आहे की, जनगणनेदरम्यान संकलित करण्यात येणारी सर्व माहिती पूर्णपणे गोपनीय राखली जाणार असून तिचा वापर केवळ शासकीय नियोजनासाठीच केला जाईल.
