१५० ते २०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या तपासातून आरोपींचा माग काढला; १०८ महागडी घड्याळे, दुचाकी आणि मोबाईल हस्तगत
वाकड पोलीसांची दमदार कामगिरी
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी…..थेरगाव येथील डांगे चौक परिसरातील घड्याळाचे दुकान फोडून लाखो रुपयांची महागडी घड्याळे चोरून पसार झालेल्या दोन चोरट्यांना वाकड पोलिसांच्या तपास पथकाने अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून चोरीची १०८ महागडी घड्याळे, गुन्ह्यात वापरलेली अॅक्टिवा दुचाकी आणि मोबाईल फोन असा एकूण ९ लाख ८४ हजार ७७० रुपयांचा शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत केला आहे. परिसरातील तब्बल १५० ते २०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करून पोलिसांनी आरोपींचा माग काढला.
दिनांक ३ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ९ ते ४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान थेरगाव येथील डांगे चौकाजवळील ‘लाले चष्मेवाले अँड वॉचेस’ या दुकानाच्या छताचे पत्रे उचकटून आणि पीओपी फोडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला होता. दुकानातील सुमारे ८ लाख २३ हजार ७०१ रुपये किमतीची घड्याळे आणि डीव्हीआर मशीन चोरून नेण्यात आले होते. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ८०७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०७, ३३१ (३), ३३१ (४), ३ (५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दुकानातील सीसीटीव्ही डीव्हीआर चोरट्यांनीच काढून नेल्यामुळे पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान होते. मात्र, वाकड पोलिसांच्या तपास पथकाने घटनास्थळाच्या आसपासचे १५० ते २०० सरकारी आणि खासगी सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा येण्या-जाण्याचा मार्ग शोधून काढत संशयितांची ओळख पटवली. आरोपी अॅक्टिवा दुचाकीवरून साथीदारासह पसार झाल्याचे तपासात निष्पन्न झाले.
दरम्यान, चोरीची घड्याळे विक्री करण्यासाठी एक संशयित काळाखडक, वाकड येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास दराडे यांनी पथकासह सापळा रचून अमिर शब्बीर शेख (वय २८, रा. भीमाशंकर कॉलनी, आदर्शनगर, किवळे) याला १० नोव्हेंबर रोजी ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने साथीदार इरफान हमीद मुलानी (वय २१, रा. मुस्लिम वाडा, पद्मावती मंदिरामागे, उर्से, ता. मावळ) याच्या मदतीने दुकानफोडी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर दुसऱ्या आरोपीला त्याच दिवशी रात्री १०.४० वाजता अटक करण्यात आली.
अटक आरोपींची पोलीस कोठडी घेऊन पोलिसांनी त्यांच्याकडून टायटन, टायटन रागा, टायटन एज, फास्टट्रॅक आदी कंपन्यांची ९ लाख ४ हजार ७७० रुपये किमतीची १०८ महागडी घड्याळे हस्तगत केली. तसेच ५० हजार रुपये किमतीची अॅक्टिवा दुचाकी आणि ३० हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जप्त केला. अशा प्रकारे चोरीच्या गुन्ह्यातील शंभर टक्के मुद्देमालासह एकूण ९ लाख ८४ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, पोलीस उपायुक्त प्रदीप जाधव (परिमंडळ-२) आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे (वाकड विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास दराडे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मारणे तसेच पोलीस अंमलदार दळे, वंदू गिरे, विजय घाडगे, विजय भुसारे, मोहम्मद नदाफ, सचिन गायकवाड, विजय मोरे, कौतेंय खराडे, ज्ञानदेव झेंडे, कारभारी पालवे, विक्रम भगत, समाधान कांबळे, प्रमोद गायके, अभिषेक मांडे आणि मंगेश लोखंडे यांनी सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास दराडे करीत आहेत.
