धानोरी-पारनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा! NDA परीक्षेत क्षितिज ठुबे याची देशभरात ३१० वी रँक
भारतीय संरक्षण दलात अधिकारी होण्याचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने दमदार पाऊल!
पुणे प्रतिनिधी : माजी सैनिकाच्या देशसेवेचा वारसा पुढे नेत क्षितिज सतीश ठुबे याने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (NDA) परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. संपूर्ण भारतातून ३१० वी रँक मिळवत त्याने धानोरी आणि पारनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
सध्या भैरवनगर, धानोरी येथे वास्तव्यास असलेला आणि मूळचा बाबुर्डी (ता. पारनेर) येथील क्षितिज ठुबे याने आपल्या मेहनतीच्या जोरावर हे यश मिळवले आहे. आजोबांनी भारतीय सैन्यात बजावलेल्या देशसेवेने प्रेरित होऊन क्षितिजनेही भारतीय संरक्षण दलात अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. त्यादृष्टीने घेतलेल्या कठोर परिश्रमांना आता यश मिळाले आहे.
क्षितिजच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे ठुबे कुटुंबीयांसह धानोरी, बाबुर्डी आणि संपूर्ण पारनेर परिसरात आनंदाचे वातावरण आहे. त्याच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्याच्या यशामुळे परिसरातील तरुणांनाही देशसेवेची प्रेरणा मिळत आहे.
आजोबांचा वारसा, नातवाची भरारी आणि देशसेवेचे स्वप्न… क्षितिजच्या यशाला मनःपूर्वक सलाम! 🇮🇳
