मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्थेचा स्तुत्य उपक्रम; ६५ कातकरी कुटुंबांसह पालांमध्ये राहणाऱ्या गरीब महिलांना दिवाळी फराळ, साड्या आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
पुणे (प्रतिनिधी) : स्वतःची दिवाळी आनंदात साजरी करताना समाजातील वंचित, उपेक्षित आणि गरजू घटकांच्याही आयुष्यात आनंदाचे क्षण फुलावेत, या उदात्त भावनेतून मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्थेच्या वतीने मावळ तालुक्यातील कातकरी आदिवासी बांधवांची दिवाळी गोड करण्यात आली.
संस्थेच्या वतीने मावळमधील राऊतवाडी येथील कातकरी वस्ती आणि शिवली येथील खडकवाडी कातकरी वस्तीतील ६५ कुटुंबांना तसेच शहरातील पालांमध्ये वास्तव्यास असलेल्या गरीब महिलांना प्रत्येकी दोन नवीन साड्या, १५ जीवनावश्यक वस्तूंचे किट आणि दिवाळीचा फराळ वाटप करण्यात आला.
“अनेक अदृश्य दानशूर व्यक्तींनी संस्थेला ५५० नवीन साड्या उपलब्ध करून दिल्या. आपण आपल्या कुटुंबासोबत आनंदात दिवाळी साजरी करतो; मात्र पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगावी भटकंती करून उदरनिर्वाह करणाऱ्या कातकरी समाजातील गरीब कुटुंबांनाही सणाचा आनंद मिळावा, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. गरजूंच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आमचीच दिवाळी साजरी झाल्याचे समाधान मिळाले. समाजाचे आपल्याला काहीतरी देणे लागते आणि ते प्रामाणिकपणे दिले पाहिजे, या भावनेतून गेल्या १४ वर्षांपासून संस्था सामाजिक कर्तव्य म्हणून हा उपक्रम राबवत आहे.”
….शहराध्यक्ष अण्णा जोगदंड,
संस्थेच्या महिला शहराध्यक्षा मीनाताई करंजावणे म्हणाल्या की, देशावर किंवा राज्यावर नैसर्गिक संकटे आली, त्या प्रत्येक वेळी संस्थेने मदतीचा हात पुढे केला आहे. यापुढेही सामाजिक बांधिलकी जपत मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांना मदत करण्यात येणार आहे.
या उपक्रमासाठी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते शंकर लगड आणि संतोष जाधव यांनी कातकरी समाजातील गरजू कुटुंबांची त्यांच्या घरी जाऊन माहिती संकलित केली. दुर्गम वस्त्यांपर्यंत पोहोचून गरजूंना शोधण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी केल्यामुळेच हा उपक्रम यशस्वी होऊ शकला, असे संस्थेचे कार्याध्यक्ष मुरलीधर दळवी यांनी सांगितले.
यावेळी शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, महिला शहराध्यक्षा मीना करंजावणे, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगीता जोगदंड, सचिन युवा मंचचे अध्यक्ष ॲड. सचिन काळे, संस्थेचे खेड अध्यक्ष शंकर नाणेकर, कार्याध्यक्ष मुरलीधर दळवी, वैशाली आवताडे, सामाजिक कार्यकर्ते शंकर लगड, संतोष जाधव, श्रेयश जोगदंड, ऋतिक घोडके, खडकवाडीचे प्रगतिशील शेतकरी अंकुश वाघमारे, गुणवंत कामगार काळूराम लांडगे, सतीश हंचाटे, अनंत जांभुळकर तसेच रमाई प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
