पुनरुत्थान समरसता गुरुकुलममधील विद्यार्थ्यांना फराळ, कपडे, टॉवेल व दिवाळी साहित्याचे वाटप
पिंपरी-चिंचवड : गुणवंत कामगार कल्याण मंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने चिंचवड येथील पुनरुत्थान समरसता गुरुकुलममधील वंचित, पारधी आणि भटक्या-विमुक्त समाजातील विद्यार्थ्यांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना दिवाळी फराळ, सुवासिक तेल, उटणे, कपडे आणि टॉवेलचे वाटप करण्यात आले.
समाजातील वंचित, दुर्बल आणि दुर्लक्षित घटकांना सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून मदत करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजाचे काहीतरी देणे लागतो, या भावनेतून संस्थेच्या संस्थापिका व अध्यक्षा डॉ. भारतीताई चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आपल्या शहरातील गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
गुरुकुलमच्या कार्याची माहिती देताना देशपांडे सर यांनी सांगितले की, शतकानुशतके उपेक्षित राहिलेल्या वंचित, पारधी आणि भटक्या-विमुक्त समुदायातील मुलांच्या शैक्षणिक व सामाजिक उन्नतीसाठी पुनरुत्थान समरसता गुरुकुलम कार्यरत आहे. ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री गिरीशजी प्रभुणे यांनी २००९ मध्ये या संस्थेची स्थापना केली. संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना पहिली ते दहावीपर्यंत मोफत शिक्षण आणि निवासाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते.
पुस्तकी ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांमधील पारंपरिक कला, हस्तकला आणि कौशल्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन त्यांना आत्मनिर्भर बनविण्याचे कार्य संस्थेमार्फत केले जाते. गुणवंत कामगार कल्याण मंडळाने केलेली मदत विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, पवना नदीला आलेल्या पुरामुळे गुरुकुलम परिसरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या वतीने गोमातांसाठी चारा दान करण्यात आला होता. या मदतीबद्दलही संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महमंदशरीफ मुलाणी यांनी केले. डॉ. भारतीताई चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन श्रीकांत कदम यांनी केले.
कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष बाळासाहेब साळुंके, किरण देशमुख, श्रीकांत कदम, संदीप पोलकम, संदीप रांगोळे, काळुराम लांडगे आणि सतीश देशमुख यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी तानाजी एकोंडे, राजेश हजारे, संजय गोळे, भरत शिंदे, महेंद्र गायकवाड, शिवराज शिंदे, शिवाजी पाटील, शंकर नाणेकर, अशोक सरपाते, अण्णा गुरव, नंदकुमार धुमाळ आणि रघुनाथ फेगडे यांनी सहकार्य केले.
