भूखंड घोटाळे, अनधिकृत बांधकामे, लाचखोरी आणि नागरी सुविधांचा बोजवारा; नगरसेवक शितल शिंदे यांचा आयुक्तांना थेट इशारा
पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत अधिकारी, ठेकेदार आणि बांधकाम व्यावसायिकांच्या कथित संगनमतातून भ्रष्टाचाराचे साम्राज्य फोफावल्याचा घणाघाती आरोप नगरसेवक शितल शिंदे यांनी केला आहे. शहरात अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट, भूखंडांचे कथित घोटाळे, लाचखोरी, कचऱ्याचे ढीग आणि नागरी सुविधांची दुरवस्था सुरू असताना प्रशासन नेमके करतेय काय, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
महापालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या कथित भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालण्याऐवजी त्यांच्यावर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करा. अन्यथा संपूर्ण शहरातील नागरिकांना सोबत घेऊन महापालिकेवर तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा थेट इशारा शिंदे यांनी आयुक्त आणि शहर अभियंत्यांना दिला आहे.
महापालिकेच्या भूखंडावरच डल्ला?
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील गरवारे कंपनीच्या भूखंडावर राबविण्यात येणाऱ्या आय टू आर (I to R) प्रकल्पात महापालिकेच्या हक्काचा मुख्य रस्त्याकडील नागरी सुविधा भूखंड बाजूला सारून कमी मूल्याचा भूखंड महापालिकेच्या माथी मारण्यात आल्याचा गंभीर आरोप शिंदे यांनी केला आहे. या कथित प्रकारामुळे महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा त्यांनी केला. नगररचना आणि बांधकाम विभागातील संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
गॅलेक्सी प्रकल्पात २.५० कोटींचा कथित घोटाळा!
चिंचवड येथील गॅलेक्सी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये मंजूर नकाशापेक्षा अधिक बांधकाम करून संपूर्ण मजला उभारण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. टीडीआर, इन्सेंटिव्ह एफएसआय आणि अॅन्सिलरी एफएसआयच्या नावाखाली ३३६ चौरस मीटरपेक्षा अधिक अतिरिक्त क्षेत्रफळाचा वापर झाल्याचा दावा शिंदे यांनी केला. या मजल्याच्या विक्रीतून सुमारे २.५० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोपही त्यांनी केला.या प्रकरणाचे तातडीने तांत्रिक ऑडिट करून संबंधित बिल्डर आणि आर्किटेक्टवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
लोकमान्य हॉस्पिटलमध्ये रुग्णांची लूट, कामगारांचे शोषण?
चिंचवड येथील लोकमान्य हॉस्पिटलमध्ये गरीब रुग्णांना हक्काच्या मोफत किंवा सवलतीच्या खाटा नाकारल्या जात असल्याचा आरोप शिंदे यांनी केला. कर्मचाऱ्यांचे वेतन महिनोन्महिने थकवून त्यांचे शोषण होत असल्याचा दावाही त्यांनी केला. जुन्या इमारतीवर स्ट्रक्चरल ऑडिट न करता सुरू असलेल्या बांधकामामुळे रुग्णांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचा आरोप करत त्यांनी महापालिकेकडे तातडीने कामबंद आदेश बजावण्याची मागणी केली.
बीआरटीचा फज्जा; कचऱ्याच्या ढिगाऱ्यांत शहर!
शहरातील बीआरटी मार्गांची दुरवस्था, वाहतूक कोंडी आणि वाढते अपघात यांवरून महापालिका प्रशासनावर शिंदे यांनी जोरदार टीका केली. कचरा संकलनाचे नियोजन कोलमडल्याने काही भागांत पाच ते सहा दिवस कचरा उचलला जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. स्मार्ट रस्त्यांवरील अतिक्रमणे, नदीपात्रातील कथित भराव आणि महापालिकेच्या मोकळ्या जागांवरील अतिक्रमणांवरही त्यांनी संताप व्यक्त केला.
१२ अधिकारी लाचखोरीत सापडल्याचा दावा
नवीन आयुक्तांच्या नियुक्तीनंतर आतापर्यंत १२ अधिकारी लाच घेताना रंगेहात पकडले जाऊन निलंबित झाल्याचा दावा शिंदे यांनी केला. प्रशासनाचा अधिकाऱ्यांवर कोणताही अंकुश राहिलेला नसल्याची टीका करत त्यांनी मुंबई महापालिकेच्या धर्तीवर आठवड्यातून एक दिवस बांधकामे बंद ठेवण्याची मागणी केली.
“नागरिकांच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांना सोडणार नाही!”…..शितल शिंदे.नगरसेवक
“पिंपरी-चिंचवड महापालिका ही नागरिकांच्या सेवेसाठी आहे, अधिकारी आणि बिल्डरांच्या वसुलीसाठी नाही! महापालिकेतील कथित घोटाळ्यांची निष्पक्ष चौकशी करून दोषी अधिकारी, बिल्डर आणि ठेकेदारांवर दंडात्मक व फौजदारी कारवाई झालीच पाहिजे. अनधिकृत कामांवर तातडीने स्टॉप वर्क नोटीस बजावावी. प्रशासनाने तातडीने कारवाई केली नाही, तर नागरिकांना सोबत घेऊन महापालिकेवर तीव्र जनआंदोलन छेडले जाईल. या आंदोलनातून उद्भवणाऱ्या परिणामांची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल,”
…..नगरसेवक शितल शिंदे, पिंपरी चिंचवड
