राही फूलतांबकरला सुवर्ण, तर अंजनेय नखातेला कांस्यपदक
पिंपरी-चिंचवड : सीबीएसई राष्ट्रीय एरोबिक्स अजिंक्यपद स्पर्धेत हेवन स्पोर्ट्स अँड फिटनेस अकादमीच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत पिंपरी-चिंचवडच्या क्रीडा क्षेत्राचा नावलौकिक वाढविला आहे. या स्पर्धेत राही फूलतांबकर हिने सुवर्णपदक, तर अंजनेय नखाते याने कांस्यपदक पटकावून राष्ट्रीय स्तरावर यश संपादन केले.
मोशी येथील एसएनबीपी समूहाच्या वतीने २७ ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत भव्य सीबीएसई राष्ट्रीय एरोबिक्स अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत देशभरातील तसेच परदेशातील सीबीएसई शाळांमधील २,५०० हून अधिक विद्यार्थी खेळाडूंनी सहभाग घेतला.
या स्पर्धेत पोदार इंटरनॅशनल स्कूल, चिंचवड येथून सहभागी झालेल्या राही फूलतांबकर हिने १४ वर्षांखालील वयोगटातील एरोबिक्स प्रकारात ८.८० गुण मिळवत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. तर एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल, रहाटणी येथून सहभागी झालेल्या अंजनेय नखाते याने याच वयोगटात ८.४८ गुण मिळवत कांस्यपदकाची कमाई केली.
विशेष म्हणजे, दोन्ही खेळाडू हेवन स्पोर्ट्स अँड फिटनेस अकादमीमध्ये नियमित सराव करतात. राही गेल्या पाच वर्षांपासून, तर अंजनेय गेल्या तीन वर्षांपासून अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण सरावाचे, शिस्तीचे आणि मेहनतीचे हे फलित असल्याचे क्रीडाक्षेत्रातून व्यक्त होत आहे.
अकादमीच्या अन्य खेळाडूंनीही स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली. रिया पळे हिने १४ वर्षांखालील वयोगटात पाचवा, तर आर्वी कोल्हे हिने दहावा क्रमांक मिळविला. सिद्धी मारे हिनेही उत्कृष्ट सादरीकरण करत स्पर्धेत सहभाग नोंदविला.
खेळाडूंच्या या यशामागे सातत्यपूर्ण प्रशिक्षण, योग्य मार्गदर्शन, कठोर परिश्रम आणि पालकांचे सहकार्य यांचा मोलाचा वाटा आहे. आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक हर्षद कुलकर्णी यांचे खेळाडूंना मार्गदर्शन लाभले. तर खेळाडूंच्या तयारीचे आणि स्पर्धेतील सहभागाचे संपूर्ण नियोजन वृंदा सुतार यांनी केले.
या यशाबद्दल अकादमीच्या सर्व पालकांनी, संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी, अकादमीचे सहाय्यक मंदार फणसाळकर, व्यवस्थापक व प्रशिक्षक चैतन्य कुलकर्णी, प्रशिक्षक आश्लेषा ढाके तसेच इतर मान्यवरांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
खेळाडूंमधील गुणवत्ता ओळखून त्यांना योग्य प्रशिक्षण, शिस्त, आत्मविश्वास आणि स्पर्धात्मक अनुभव देणे हे अकादमीचे प्रमुख उद्दिष्ट आहे. राष्ट्रीय स्तरावरील या यशामुळे खेळाडूंना भविष्यात आणखी मोठी कामगिरी करण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास अकादमीच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
हेवन स्पोर्ट्स अँड फिटनेस अकादमीच्या खेळाडूंनी मिळविलेल्या या यशामुळे पिंपरी-चिंचवडच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
