दिलीप रोकडे प्रथम, माणिक येकाड द्वितीय, तर पंढरीनाथ सानप यांनी पटकावला तृतीय क्रमांक
पुणे/किवळे, प्रतिनिधी : लायन्स क्लब निगडी प्राधिकरण यांच्या वतीने रविवारी (दि. २५ ऑक्टोबर) ज्येष्ठ नागरिक महिला व पुरुषांसाठी आयोजित करण्यात आलेल्या पाच किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेत ज्येष्ठ नागरिक संघ, किवळे विकासनगरच्या सभासदांनी उल्लेखनीय कामगिरी करत यश संपादन केले.
भेळ चौक ते संभाजी चौकमार्गे बिना स्कूल या मार्गावर ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत महिला व पुरुष मिळून सुमारे १५० स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
या स्पर्धेत ज्येष्ठ नागरिक संघ, किवळे विकासनगरचे सभासद दिलीप रोकडे यांनी प्रथम क्रमांक, संघाचे सहचिटणीस माणिक येकाड यांनी द्वितीय क्रमांक, तर सचिव पंढरीनाथ सानप यांनी तृतीय क्रमांक पटकावला. लायन्स क्लब निगडी प्राधिकरणच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते तिन्ही विजेत्यांना पदके देऊन सन्मानित करण्यात आले.
ज्येष्ठ वयातही उत्साह, जिद्द आणि शारीरिक तंदुरुस्तीच्या जोरावर या तिघांनी मिळवलेल्या यशाचे किवळे विकासनगर परिसरात कौतुक होत आहे. त्यांच्या कामगिरीमुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता आणि व्यायामाची प्रेरणा निर्माण झाली आहे.
