पाचोरा येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान; मान्यवरांनी विद्यार्थ्यांना दिले यशाचे मार्गदर्शन
जळगाव/पाचोरा, प्रतिनिधी : अहिर सुवर्णकार मंडळ, पाचोरा, जिल्हा जळगाव यांच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा २०२६ रविवार, दि. २५ ऑक्टोबर रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रोत्साहन देणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या सोहळ्यास प्रमुख मान्यवर म्हणून पुणे विभागाचे धर्मादाय सहआयुक्त श्री. विनेशजी एकनाथशेठ कोठलीकर, टाटा मूलभूत संशोधन संस्था (TIFR), मुंबई येथील वैज्ञानिक अधिकारी श्री. सिद्धेश संजय थोरात आणि महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट कारागीर पुरस्कारप्राप्त हस्तकलाकार सौ. निताताई प्रविणशेठ जडे (पारोळा) उपस्थित होते.
यावेळी शैक्षणिक क्षेत्रात यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. मेहनत, सातत्य, शिस्त आणि जिद्द यांच्या जोरावर जीवनात मोठे यश संपादन करता येते, असा प्रेरणादायी संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन विविध क्षेत्रांत आपली गुणवत्ता सिद्ध करावी आणि समाजाच्या प्रगतीत योगदान द्यावे, असे आवाहन या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आले.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान म्हणजे त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणेची नवी दिशा! अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो, त्यांच्यात स्पर्धात्मक वृत्ती निर्माण होते आणि समाजात शिक्षणाविषयी सकारात्मक वातावरण तयार होते.
अहिर सुवर्णकार मंडळाच्या या स्तुत्य उपक्रमाचे समाजबांधवांकडून कौतुक होत असून, गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करणारा हा सोहळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.
