काँग्रेस शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांची मागणी; आंदोलनाचा पाचवा दिवस
चिंचवड/सांगवी प्रतिनिधी : सांगवी येथील संविधान चौकातील संविधानाचे शिल्प हटवल्याच्या निषेधार्थ सुरू असलेल्या आंदोलनाचा सोमवारी (दि. २६) पाचवा दिवस होता. या चौकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा, चौकाला ‘विश्वरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक’ असे नाव द्यावे आणि संपूर्ण परिसर ‘संविधान सृष्टी’ म्हणून विकसित करावा, अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी केली.
या आंदोलनात संविधानवादी कार्यकर्ते, आंबेडकरवादी नागरिक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि सर्वसामान्य नागरिक सहभागी झाले आहेत. संविधानाचा सन्मान राखून चौकाचा नियोजनबद्ध विकास करण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे.
यावेळी नरेंद्र बनसोडे यांनी भाजपच्या नगरसेविका तृप्ती कांबळे आणि त्यांचे पती संतोष कांबळे यांच्यावर संविधानाचे शिल्प हटवल्याप्रकरणी टीका केली. संबंधितांनी समाजासमोर येऊन या प्रकरणावर स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, महानगरपालिकेच्या वतीने स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याचा आरोप करत, प्रकरणात कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी खासगी तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आंदोलनाला बदनाम करण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोपही बनसोडे यांनी केला. आंदोलनस्थळी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, संबंधित प्रकरणातील आरोपीला अद्याप अटक का करण्यात आलेली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
‘संविधान सृष्टी’त संविधानाची मूल्ये नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची मागणी
सांगवीतील संविधान चौक परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) क्वार्टर्सच्या भिंतींचा उपयोग करून भारतीय संविधानातील महत्त्वाची कलमे, मूलभूत हक्क, कर्तव्ये, मूल्ये आणि तत्त्वे नागरिकांसमोर मांडावीत. यासाठी भिंतींवर संविधानविषयक म्युरल्स, शिल्पचित्रे आणि माहितीफलक उभारून हा परिसर संविधानाच्या विचारांचा प्रसार करणारे कायमस्वरूपी स्मारक बनवावे, अशी भूमिका बनसोडे यांनी मांडली.
संविधान चौकातील काम २६ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याची घाई कशासाठी, असा सवाल करत त्यांनी सार्वजनिक कामांसाठी आवश्यक प्रशासकीय मंजुरी, अंदाजपत्रक, कार्यादेश आणि कायदेशीर प्रक्रियांचे पालन करणे गरजेचे असल्याचे सांगितले. शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू असल्यास विकासकामांच्या घोषणांची व्यवहार्यता आणि नियमांनुसार अंमलबजावणी तपासणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
१४ एप्रिलपर्यंत विकासकामे पूर्ण करण्याची सूचना
२६ नोव्हेंबर हा संविधान दिन महत्त्वाचा असला, तरी केवळ त्या तारखेच्या उद्देशाने घाईघाईने काम करण्याऐवजी नियोजनबद्ध प्रशासकीय प्रक्रिया राबवावी, असे बनसोडे म्हणाले. येत्या १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून संविधान चौकातील पूर्णाकृती पुतळा आणि ‘संविधान सृष्टी’च्या विकासाचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी त्यांनी केली.
यासाठी आवश्यक खर्चाचे अंदाजपत्रक, प्रशासकीय मंजुरी आणि इतर प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संविधानातील महत्त्वाच्या तरतुदींची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी काँग्रेस पक्ष स्वतंत्र लढा उभारणार असून, या आंदोलनाची पुढील दिशा आणि स्वरूप लवकरच जाहीर करण्यात येईल, असे नरेंद्र बनसोडे यांनी सांगितले.
