काँक्रीटीकरणाच्या कामामुळे वाहतूक वळवली; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
पिंपरी-चिंचवड : वाकड येथील प्रभाग क्रमांक २६ मधील छत्रपती चौक ते मानकर चौक रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. या कामामुळे मानकर चौकाकडून छत्रपती चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. वाहतूक मार्गातील हा बदल १३ ऑक्टोबर २०२६ पासून लागू करण्यात आला आहे.
छत्रपती चौक ते सोनिगरा सोसायटीपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले असून, सोनिगरा सोसायटी ते मानकर चौक या दरम्यानचे काम अद्याप बाकी आहे. या परिसरात वाहनांमुळे कामात अडथळे निर्माण होत असून वाहतूककोंडीचाही सामना करावा लागत आहे. त्यामुळे कामाला गती देण्यासाठी वाहतूक वळविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
असे असतील पर्यायी मार्ग….
१. मानकर चौकाकडून छत्रपती चौकाकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी कस्पटे कॉर्नर चौकातून पुढे इच्छित स्थळी जावे.
२. मानकर चौकाकडून यू-टर्न घेऊन कस्पटे चौक मार्गे इच्छित स्थळी जाता येईल.
पोलीस उपआयुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी-चिंचवड यांच्या दि. २ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या अधिसूचनेनुसार हे वाहतूक बदल करण्यात आले आहेत. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून वाहतूक व्यवस्थेला सहकार्य करावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कार्यकारी अभियंता (स्थापत्य), ‘ज’ क्षेत्रीय कार्यालयाचे सुनील शिंदे यांनी केले आहे.
